
Ahmednagar : राळेगणसिद्धीत आरोग्य केंद्रासाठी सात कोटी
पारनेर : राळेगणसिद्धी येथे सात कोटी दोन लाख खर्च करून राळेगणसिद्धी परिवारातील गावांसाठी, तसेच परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहत आहे. या आरोग्य केंद्राच्या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूचना केल्या.
या वेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेटही घेतली. राळेगणसिद्धी परिसरातील जनतेसाठी थेट पळवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने व ते खूप दूरवर असल्याने तेथे जाणे रुग्णांना शक्य होत नव्हते. तेथे जाण्या-येण्यासाठी कोणत्याही साधनांची सोय नाही. खासगी वाहनाने जाण्यापेक्षा खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणे स्वस्तात पडत असे. याचा विचार करून हजारे यांनी खास जनतेच्या सोयीसाठी राळेगणसिद्धीत प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले. त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या कामाची पाहणी डॉ. विखे यांनी करत अधिकाऱ्यांना कामाबाबत सूचना केल्या.
डॉ. विखे यांनी हजारे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी करत विविध विषयांवर चर्चाही केली. सरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे, जयसिंग मापारी, दत्ता आवारी, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, अंकुश पाटील व ठेकेदार उपस्थित होते.