Ahmednagar : तालुक्यात कारभारणींच्या हाती सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला

Ahmednagar : तालुक्यात कारभारणींच्या हाती सत्ता

नगर तालुका : गावकीच्या कारभारात आता महिलांचा वाढता सहभाग जाणवत असून, आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी विजयी झालेल्या १९ कारभारणींच्या हाती गावच्या चाव्या आल्या आहेत. वाळकी आणि सारोळा कासार या मोठ्या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

येथे झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज मतमोजणीत वाळकीतून शरद बोठे यांनी, तर सारोळा कासारमधून रवींद्र कडूस यांच्या पत्नी आरती कडूस यांनी विरोधकांना धूळ चारत विजय संपादन केला. मदडगावात अनिल शेडाळे यांची १५ वर्षांची सत्ता उलथवत साहेबराव शेडाळे यांनी सत्ता काबीज केली. आठवडमध्ये बाबासाहेब गुंजाळ व विद्यमान सरपंच राजेंद्र मोरे यांच्यावर विजय मिळवत सुनील लगड यांनी सरपंचपद हस्तगत केले. उक्कडगाव येथे नवनाथ म्हस्के यांनी, तर राळेगणमध्ये सुधीर भापकर यांनी सत्ता राखण्यात यश मिळविले. तेथे दीपाली सुधीर भापकर यांनी विजय मिळवला.

नेप्तीत संजय जपकर गटावर ग्रामस्थांनी पुन्हा विश्‍वास दाखवला आहे. जखणगावात डॉ. सुनील गंधे यांना ‘नोटा’चा हातभार लागल्याने, अतिशय चुरशीच्या पंचरंगी लढतीत त्यांनी बाजी मारली.

इंजिनिअर सरपंच

नारायणडोह येथील श्रद्धा बाळासाहेब साठे-गुंड या इंजिनिअर युवतीने तालुक्यातील प्रभावी नेतृत्व असलेल्या शंकरराव साठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक लढवली. विरोधी सोनाली अविनाश साठे यांचा तिने पराभव केला. तसेच, सहा सदस्यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.