अहमदनगर : शाश्‍वत विकासासाठी गावाचा आराखडा महत्त्वाचा] | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाश्‍वत विकासासाठी गावाचा आराखडा महत्त्वाचा

अहमदनगर : शाश्‍वत विकासासाठी गावाचा आराखडा महत्त्वाचा

अहमदनगर ः कामाचे कौतुक झाले, की कामे करण्यास आणखी प्रेरणा मिळते. कोरोना काळात शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळ्यात भरभरून कौतुक करून शाबासकीची थाप दिली. प्रत्येक पुरस्काराच्या वेळी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या अडचणी म्हणजे मी कामाचे आॅडिट समजतो, असे मत आदर्श हिवरे बाजारचे तथा आदर्श गाव प्रकल्प व संकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर आज (सोमवारी) पोपटराव पवार यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. पवार म्हणाले की, गेल्या ३० ते ३५ वर्षांत केलेल्या कामाचे पद्मश्री पुरस्कार हे फळ आहे. या फळात फक्त माझेच कष्ट नसून, सर्व ग्रामस्थांचे आहेत. पुरस्कार स्वीकारणार असल्याचे केंद्राला पत्र पाठविल्यानंतर सायंकाळी सहा वाजता नावाची घोषणा झाली. त्यावेळी मी मुलीच्या घरी होतो. त्याचवेळी सहाच्या सुमारास मला सत्यजित तांबे यांचा पहिला दूरध्वनी येऊन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. पहिला सत्कार मुलीच्या येथेच झाला. त्यानंतर दूरध्वनी सुरु झाले ते पहाटे दोन वाजेपर्यंत.

लोकसहभागातून कामे केली

गावात कामे करताना पुरस्कारासाठी कधीच काम केले नाही. कामे केली, त्यानंतर पुरस्कार घेतले आहेत. विशेष म्हणजे गावात लोकसहभागातून कामे करण्यात आलेली आहेत. गावाचा विकास करताना ग्रामविकासाचा आराखडा असणे गरजेचे आहे. मी कामे करताना हेच धोरण अवलंबिले आहे. गावातील प्रत्येक कामात लोकसहभाग घेतलेला आहे. त्यामुळे गावात विकासाची गंगा वाहात आहे.

‘तो’ विकास अधिक टिकतो

पुरस्कार व योजनांमध्ये सहभागी होऊन गावांचा विकास केला जातो. मात्र तो शाश्‍वत विकास होत नाही. प्रत्येकाने शाश्‍वत विकासासाठी गावाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. पुरस्कार व योजनांमधून केलेला विकास जास्त काळ टिकत नाही. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच आराखड्यातून केलेले काम चिरकाल टिकते, असेही ते म्हणाले.

शाळा बांधणीचा निर्णय फायद्याचा

जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे काम करताना त्यात बदल केला. तो बदल कोरोना काळात उपयोगी ठरला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार शाळा खोल्या बांधल्या असत्या, तर त्याचा उपयोग कोरोना काळात शाळा सुरू करताना झाला नसता. हे सर्व विविध ठिकाणी भेटी दिल्यामुळेच लक्षात आले होते.

कोरोना काळात शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा गावाला व शाळेला चांगला फायदा झालेला आहे. शाळेचा पट वाढलेला आहे. गावासह परगावातील विद्यार्थी आता शाळेत येऊ लागले आहेत. ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच शाळा कोरोनात सुरु करून यशस्वीपणे चालवता आलेली आहे.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

इंग्रजी अंगणवाडी

गावात अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे दिले जात आहेत. त्याचा फायदा प्राथमिक शाळेत विद्यार्थी आल्यानंतर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी अभ्यासक्रमाची ओळख पूर्ण होऊन त्याचा फायदा त्यांना आगामी शिक्षणात होत आहे.

तो आवाज आजही कानात घुमतोय

पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला जाण्याअगोदर कोरोनाची चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. ही तपासणी झाल्यानंतर तेथील पाहणी करत असतानाच वाहनचालकाचा दूरध्वनी आला की रुग्णालयातून धूर निघत आहे. मी घटनास्थळाकडे धाव घेऊन मदत कार्याला सुरवात केली. परंतु त्यावेळी धूर असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. तसेच दरवाजा तोडण्याचा प्रयत्न कर्मचारी करीत होते. त्याचवेळी मी पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांशी, त्यानंतर जिल्हाधिकारी व अग्निशमन यंत्रणेशी संपर्क साधून माहिती देऊन मदत कार्यात सहभागी झालो. तीन मिनिटांत सर्व काही झाले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी अग्निशामक दल दाखल झाल्यानंतर त्यांनी दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आत जाता येत नव्हते. त्यावेळी खिडकीतून पाणी आत फवारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अग्निशामक दलाचा पाईप हाती घेऊन जोडजाड करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मी कोण हे माहिती नव्हते. यावेळी मात्र डॉक्टर घुगे मदत कार्य करत असताना त्यांच्या हाताला जखमीही झाली होती. नातेवाईक, रुग्ण यांचा त्यावेळीचा आवाज आजही कानात घुमतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

पद्मश्री पुरस्‍कार वितरण सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिवरेबाजारला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्‍यांनी हे निमंत्रण स्‍वीकारत लवकरच हिवरेबाजारला भेट देण्याचे आवश्‍वासन दिले आहे, अशी माहिती पोपटराव पवार यांनी यावेळी दिली.

loading image
go to top