Ahmednagar News : गुरुजी, हे वागणं बरं नव्हं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Zilla Parishad News

Ahmednagar News: गुरुजी, हे वागणं बरं नव्हं...

Ahmednagar News: शिक्षकांविषयी समाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीचे विद्यार्थी अनुकरण करतात. त्यामुळेच त्यांच्याकडून सद्‍वर्तनाची अपेक्षा असते. मात्र, जिल्हा परिषदेकडील गैरवर्तनाची आकडेवारी लाज आणणारी आहे.

तब्बल ४० जणांवर विविध प्रकारचे आरोप सिद्ध झालेत. शालेय कामातील अनियमितता, गैरहजेरी यासह मुलींसोबत गैरवर्तनाच्या गंभीर आरोपाचांही त्यात समावेश होता. अवघ्या दोन वर्षांतील ही कारवाई आहे. या कारणांतूनच गुरुजी, हे वागणं बरं नव्हं, असं म्हणण्याची वेळ आलीय.

जिल्हा परिषदेच्या तीन हजार ५६८ शाळा आहेत. त्यात एक लाख १६ हजार ६७५ मुले, तर एक लाख ११ हजार ६३७ मुली, अशी एकूण दोन लाख २८ हजार ३१२ विद्यार्थी संख्या आहे. शिक्षकांची संख्या ११ हजार १७९ आहे. शिक्षकांवरील कारवाईचा वाढता आलेख चिंता वाढवणारा आहे.

२०२० पासून ४६ जणांना निलंबित करण्यात आले. त्यात ४३ शिक्षक संवर्गातील, २ केंद्र प्रमुख, एका विस्तार अधिकाऱ्याचा समावेश आहे. आरोप ठेवलेल्या ४६ पैकी ४० जणांवरील आरोप सिद्ध झाले. त्यांना विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. यात एकाही महिला शिक्षिकेचा समावेश नाही.

काही शिक्षकांवर तर चोरीचाही आरोप आहे. ज्ञानदानाचे काम करण्याऐवजी डमी शिक्षक नेमून पळवाट काढण्याचे प्रकारही आढळले आहेत. विद्यार्थिनींना संस्काराचे धडे देण्याऐवजी त्यांच्यासोबत गैरवर्तन करणारे महाभाग आहेत.

आता यात राजकीय हेतूने गुंतवल्याचाही काही शिक्षकांचा आरोप आहे. असे असले तरी काही पुराव्याअभावी निसटल्याचीही उदाहरणे आहेत. एकंदरीत छेडछाडीचे प्रकार शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. गंभीर आरोप होत असले, तरी जादा तास घेऊन मुलांच्या भवितव्यासाठी झटणारे गुरुजी आहेत. ज्ञानदानासोबत आर्थिक मदत करणारेही आहेत.

विद्यार्थिनींशी गैरवर्तन

चाळीस जणांमध्ये सात जणांवर मुलींच्या छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाची शिक्षा लागलेल्यांमध्ये नऊ गुरुजींचा समावेश आहे. पतीच्या छळासह विविध प्रकारचे हे गुन्हे आहेत.

त्यांच्यावर आरोप सिद्ध झाल्याने मूळ वेतनावर आणणे, वेतनवाढी थोपवणे, बडतर्फ करणे आदी प्रकारच्या त्यांना शिक्षा सुनावली आहे. अध्यापनाऐवजी राजकारणात सक्रिय सहभाग घेणे, चोरीछुपे सावकारी करणे असे प्रकारही घडत आहेत. मात्र, पुराव्याअभावी त्यांच्यावर कारवाई होत नाही.

वर्तनपुस्तिका काय सांगते...

शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी कसे वागावे, याबाबत जिल्हा परिषद अॅक्ट १९६७ मध्ये नमूद करण्यात आले आहे. ती एक प्रकारची आचारसंहिता आहे. त्यात असे म्हटले आहे, कर्मचारी सदैव निरपवाद व सचोटीने वागेल. सदैव कर्तव्य परायण राहील.

संप व निदर्शने करणार नाही. राजकारणात भाग घेणार नाही. पहिली पत्नी हयात असताना दुसरी करता येणार नाही. खासगी धंदा अथवा व्यापार करता येणार नाही.

प्रत्येक क्षेत्रात अपवादात्मक अपप्रवृत्ती असतात. अशा गैरवर्तनी शिक्षकांमुळे सर्व शिक्षकांचीच बदनामी होते. अनैतिक चूक असलेल्या कुठल्याही शिक्षकाला प्राथमिक शिक्षक संघ पाठिशी घालणार नाही. प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यामुळे जरब बसेल.

- डॉ. संजय कळमकर, राज्य नेते, प्राथमिक शिक्षक संघ