
विशेष म्हणजे, त्यात काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले, तरी पोलिसांनी सेवेत खंड पडू दिला नाही. लॉकडाउनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली, तेव्हा पोलिसच मदतीला धावले.
नगर : विविध घटनांनी राज्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नगर जिल्ह्यात सरत्या वर्षात खाकी वर्दीतील माणुसकी दिसून आली. पोलिस दलासह सामाजिक संस्थांनी त्यासाठी मोठे योगदान दिले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची दखल घेत, नगरच्या पोलिसांचे कौतुक केले. कोरोनामुळे गुन्हेगारीला आळा बसला. मात्र, लॉकडाउनमधून शिथिलता दिल्यावर गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले.
वर्षाच्या सुरवातीला जानेवारी, फेब्रुवारीत किरकोळ घटना घडल्या. कोरोनामुळे मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे आरोपींच्या शोधात राहणारा पोलिसदादा कोरोनापासून सामान्यांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर आला. स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा केली.
विशेष म्हणजे, त्यात काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले, तरी पोलिसांनी सेवेत खंड पडू दिला नाही. लॉकडाउनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली, तेव्हा पोलिसच मदतीला धावले.
समाजसेवी संस्थांच्या मदतीने वंचितांच्या घरी जाऊन किराणा दिला. स्थलांतरित वाटसरूंना जेवण दिले. अन्नछत्र चालवून अनेकांचे सण-उत्सव गोड केले. शहर विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबविण्यात आले.
घर घर लंगर, आनंदधाम फाउंडेशन, समस्त जैन समाज, लाल टाकी सेवा मंडळ, बन्सी महाराज अन्नपूर्णा आदी संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. त्यासाठी पोलिस अक्षरक्ष: "पोस्टमन' झाले. अगदी मुक्या जनावरांनाही पोलिसांनी घास भरविण्याचे काम केले.
लॉकडाउनमध्ये ग्रामीण भागात बांधावरून वाद, भावकीतील वादाचे प्रकार समोर आले. अपत्य जन्माबाबतच्या वक्तव्यावरून निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला सुरू झाला. नेवासे तालुक्यातील वकिलांच्या हत्येने जिल्हा ढवळून निघाला. लॉकडाउनमधून शिथिलता मिळताच, गुन्हेगारीही वाढली.
ऑडिओ प्रकरणाची चर्चा
जिल्ह्यात नव्याने बदलून आलेले तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलेच गाजले. डॉ. राठोड यांची त्यातून बदली झाली. डॉ. राठोड यांच्या विशेष पथकाने बनावट डिझेलचे टॅंकर पकडले. त्यात संपूर्ण पथकच निलंबित झाले.
वंचितांची चूल पेटवली
लॉकडाउनमध्ये 25 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पोलिस दलाने वंचितांच्या घराची चूल पेटवली. गरजूंना किराणा साहित्यांचे 7660 किट वाटले. घर घर लंगर, आनंदधाम, समस्त जैन, लाल टाकी सेवा मंडळ, बन्सी महाराज अन्नपूर्णा मंडळाच्या मदतीने नगर शहर व परिसरातील गरजूंना 7 लाख 36 हजार 212 अन्नपाकिटे वाटली.