Ahmednager ‘लम्पी’चे अडीच हजारांवर बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lumpy skin disease

Ahmednager : ‘लम्पी’चे अडीच हजारांवर बळी

अहमदनगर ः लम्पी आजाराने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. तथापि, पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नाने १५ लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अडीच हजारांवर जनावरांचा लम्पीने बळी घेतला आहे. लसीकरण शंभर टक्के झाल्याने मृत्यूचे प्रमाण घटू लागले आहे. लम्पी आजारामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गायींना हा आजार बाधत असल्याने दुभती जनावरे मृत्युमुखी पडली.

परिणामी, शेतकऱ्यांचे चालू चलन खंडित झाले. जिल्ह्यात आजाराचा फैलाव संगमनेर, कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला होता. या भागात असलेल्या जर्सी दुभत्या गायी मृत्युमुखी पडल्या. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लसीकरणावर भर देण्यात आला, तसेच गोठ्यांवर भेटी देऊन तेथील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बाधित जनावरे विलगीकरण अशा उपाययोजना तातडीने करण्यात आल्या. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

वासरांवर लक्ष

लस असलेल्या कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, चार महिन्यांच्या आतील वासरांचे लसीकरण करता येत नाही. त्यामुळे प्रारंभी वासरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. तथापि, चार महिने झाल्यानंतर लगेचच लसीकरण कण्यात येत आहे. त्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडे नोंदी आहेत.

अशी राबविली मोहीम

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ ही मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक गावात कीटकनाशकाची धुरळणी केली. जनावरे आजारी असलेल्या गोठ्यांत जंतुनाशकांची फवारणी केली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आतापर्यंत १५६८ गावांत धुरळणी पूर्ण झाली आहे.

१९६ पशुविकास अधिकारी, ४२ सहायक पशुधन अधिकारी, १२५ पशुधन पर्यवेक्षक, ४२ हंगामी पशुधन अधिकारी, ३ कंत्राटी पशुधन विकास अधिकारी, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले ८ अधिकारी, विद्यापीठाची दोन टीम, २१ प्रशिक्षणार्थी अशा सुमारे ४३७ जणांची टीम जिल्ह्यात सध्या लम्पीनिवारणावर काम करीत आहे.

अशी घ्यावी काळजी

 • चावणाऱ्या माश्यांमुळे हा आजार होतो. त्यामुळे गोठा स्वच्छ हवा

 • गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे

 • गोठ्यात धुरळणी करावी

 • आजारी जनावरांचे विलगीकरण करावे

 • लक्षणे असलेल्या जनावरांना तत्काळ औषधे सुरू करावीत

आकडे बोलतात

 1. ४९९२८ - बाधित जनावरे

 2. ३९७१५ - बरे झालेली

 3. ७४.४ टक्के - बरे होण्याचे प्रमाण

 4. ७५१८ - सध्या आजारी जनावरे

 5. ५६५९ - लक्षणे असलेली

 6. ११७६ - मध्यम लक्षणे असलेली

 7. ६८३ - गंभीर आजारी

 8. ८६९३ - वासरांचे लसीकरण

 9. १५४६३२ - एकूण लसीकरण

 10. १८१७ - गायींचा मृत्यू

 11. २९६ - बैलांचा मृत्यू

 12. ५८१ - वासरांचा मृत्यू

 13. २६९५ - मृत्यू झालेली जनावरे

"लम्पी आल्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमच्या टीमने तातडीने कार्यवाही केली आहे. त्यासाठी सुमारे साडेचारशे अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम काम करीत आहे. हा आजार आटोक्यात येत आहे."

- डॉ. संजय कुमकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी