Ahmednager अकोळनेरची समृद्ध फुलशेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednager

अकोळनेर परिसरातील गावांत सुमारे दोनशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर फुलशेती केली जाते

Ahmednager : अकोळनेरची समृद्ध फुलशेती

नगर तालुका :अकोळनेर परिसराची (ता. नगर)ओळख फूलउत्पादकांचे गाव म्हणून सर्वदूर आहे. फुलांचे आगार म्हणून परिसराची राज्यभर कीर्ती आहे. ८० वर्षांपूर्वी सुरू झालेली फुलशेतीची परंपरा आजही जोपासली जाते. सिंचनाचा अभाव असूनही पाण्याची सुविधा व काटेकोर नियोजनातून शेवंती, गुलाब, जरबेरा, झेंडू, गलांडा आदी फुलांची विविधता शेतकऱ्यांनी जपली आहे.

अकोळनेर परिसरातील गावांत सुमारे दोनशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर फुलशेती केली जात आहे. अकोळनेर, भोरवाडी, रायतळे, सुपा, चास, कामरगाव आदी गावांच्या शिवारात फुलांचे उत्पादन घेतले जाते. हा परिसर तसा दुष्काळी. बहुतांश शेती पावसावरच अवलंबून असते. ८० वर्षांपूर्वी फुलांचे उत्पादन घ्यायला सुरवात झाली. सुरवातीला नामदेव शेळके व हनुमंत शेळके यांनी अर्ध्या एकरात शेवंतीची लागवड केली.

आर्थिकदृष्ट्या ही फुलशेती किफायतशीर वाटू लागल्यानंतर हळूहळू गावातील शेतकरी फुलशेतीकडे वळू लागले. गावातील सुमारे ७० टक्के शेतकरी या फुलशेतीत गुंतले आहेत. परिसरात सर्वाधिक शेवंतीची लागवड होते. याशिवाय गुलाब, झेंडू, ऑर्किड, अस्टर, गलांडा आणि पॉलिहाऊसमध्ये जरबेरा अशी विविधता दिसून येते.

मार्गशीर्ष महिन्यासह श्रावण, गणेश उत्सव, नवरात्र- दसरा, दिवाळी व अन्य सण- उत्सव व लग्नसमारंभ अशी वर्षभर असलेली मागणी लक्षात घेतली जाते. त्यादृष्टीने लागवडीचे नियोजन केले जाते. वीस वर्षांपासून शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासल्यास टॅंकरच्या पाण्यावर फुलशेती जगवतात. काही शेतकऱ्यांनी एक लाख लिटर क्षमतेच्या सिमेंट टाक्या बांधल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे शेततळी आहेत.

आमच्या आजोबांनी सुरवातीला फुलशेती केली. त्यानंतर गावांतील अनेक शेतकरी त्याकडे वळले. अनेक तरुण शेतकऱ्यांनी फुलशेतीला प्राधान्य दिले आहे. मी रोपवाटिकाही सुरू केली आहे. गावाला आर्थिक सक्षमता देण्यामध्ये फुलशेतीचा महत्त्वाचा वाटा आहे.

- सागर विलासराव शेळके

गावातील शेतकरी आणि त्यातही तरुणवर्गाला लागवडीपासून ते ‘मार्केटिंग’पर्यंत फुलशेती अवगत झाली आहे. त्यामुळेच फुलशेतीत आमचे गाव यशस्वी झाले आहे.

- प्रतीक शेळके, सरपंच, अकोळनेर