अकोल्यात महाविकास आघाडीत निवडणुकीआधीच बेबनाव, शिवसेनेतच गटबाजी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

या पूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत येणाऱ्या निवडणुका आघाडी जमली नाही तर स्वबळावर लढण्याचे सुतोवाच केले आहे.

अकोले : अकोले नगरपंचायत व अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अकोलेतील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रण न दिल्याने अकोले तालुक्यातील आघाडीत बिघाडी झाली असल्याची चर्चा सुरू आहे.

पंचायत समितीचे सदस्य मारुती मेंगाळ यांनी आपणाला आमंत्रण होते. मात्र, काम असल्याने जाता आले नाही, असे म्हटले आहे . त्यामुळे शिवसेनेतच गट पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. 
अकोले तालुक्यात नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. 

या पूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत येणाऱ्या निवडणुका आघाडी जमली नाही तर स्वबळावर लढण्याचे सुतोवाच केले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे आ. डॉ. किरण लहामटे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दशरथ सावंत, राष्ट्रवादीचे अशोक भांगरे, माकपचे डॉ. अजित नवले, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, काँग्रेसचे सोन्याबापू वाकचौरे, अगस्तीचे माजी संचालक बाळासाहेब नाईकवाडी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीला शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रण नसल्याने ते या बैठकीला गैरहजर राहिले. या बैठकीत नगर पंचायत व कारखाना निवडणुकी बाबत रणनीतीदेखील आखण्यात आली. शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला आमंत्रण नसल्याने ही बैठक अधिक चर्चेची ठरली.

अकोले तालुक्यात शिवसेना पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. या पूर्वी झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेला दोन नंबरची मते पडली आहेत. त्यामुळे पिचडांना सत्तेतून दूर करायचे असेल तर शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिलीच पाहिजे. अन्यथा हाताने पायावर धोंडा पाडून घेतला जाईल, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.

पिचड विरोधकांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरु झाले आहे. या बैठकीबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी दिली आहे.

शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीचे शिवसेनेला आमंत्रण नव्हते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेना हा सत्तारूढ पक्ष असल्यामुळे अकोले तालुक्यातील निवडणुकांमध्ये जागांचे समसमान वाटप होणे गरजेचे आहे.

शिवसेनेच्या बाजीराव दराडे यांचेवर अनुसूचित जाती जमाती कायदान्वये फिर्याद झाल्याने तेही तटस्थ आहेत. तर मारुती मेंगाळ यांनी आपणाला निमंत्रण दिले होते. काही कारणास्तव जाता आले नाही, तर डॉ. विजय पोपेरे यांनी याबाबत लवकरच बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते हे लवकरच कळेल.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी ही बैठक ज्यांनी आम्हाला विधानसभेत मदत केली, त्यांच्याशी समन्वय राहावा म्हणून व निवडणुकीची रणनीती कशी असेल याची प्राथमिक चर्चा करण्यसाठी आम्ही एकत्र आलो होतो. मारुती मेंगाळ आमच्यासोबत आहेत. 

 

अकोले तालुक्यात शिवसेना हा मोठा पक्ष आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आम्हाला बैठकांचे आमंत्रण देणे गरजेचे आहे.अन्यथा आम्हाला ही स्वबळाची तयारी ठेवावी लागेल. 

- मच्छिंद्र धुमाळ, शिवसेना तालुकाप्रमुख.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akola, the Mahavikas alliance is already divided