Ahmednagar : मतदानावरून पिचड-भांगरे मध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : मतदानावरून पिचड-भांगरे मध्ये जुंपली

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी आज (रविवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. शेंडी केंद्रावर मृत महिलेच्या तसेच एका पोलिस अधिकाऱ्याच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप करत, संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रासमोर दुपारी तीन वाजता आंदोलन सुरू केले. यावेळी माजी आमदार वैभव विचड व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे वातावण तणावग्रस्त बनले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला.

घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, नरेंद्र साबळे व पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी माजी आमदार वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड हे ही केंद्रावर पोहचले. यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देऊन फेर मतदानाची मागणी केली.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे, दिलीप भांगरे हेही मतदान केंद्रावर आले. भांगरे व पिचड यांच्यात यावेळी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले होते. पोलिसांनी मध्यस्ती करून हा वाद मिटविला. मात्र शेतकरी विकास मंडळ कार्यकर्ते घटनास्थळी ठाण मांडून होते.

केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. पुरी यांनी घटनेबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविला असल्याचे सांगितले. रात्री दहा वाजेपर्यंत निर्णय न झाल्याने कार्यकर्ते व नेते केंद्रावर थांबून होते.

मतदान केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सीसीटीव्ही हाताळणारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, ती कथित बोगस मतदान करणाऱ्यांचा शोध घेत आहे. यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- नरेंद्र साबळे, सहायक पोलिस निरीक्षक, राजूर पोलिस ठाणे

शेंडी मतदान केंद्रातील बोगस मतदानप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच न्यायालयाचा आदेश असल्याने ही निवडणूक होत आहे. फेरमतदानाच्या संदर्भात ज्यांची तक्रार असेल, त्यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत. त्यांनी न्यायालयात जावे. मतदान मोजणी उद्या (ता. २६) सकाळी दहा वाजता अकोले येथील शेतकरी सभागृहात होईल.

- जी. जी. पुरी, निवडणूक निर्णय अधिकारी