किडीचा प्रादुर्भाव आणि पावसामुळे पिकांना फटका, शेतकरी राजा अडचणीत

kharip
kharip

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात यंदा खरीप पिकांची ४७,३३५ .११ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सोयाबीन पिकाची १०,५६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून मध्यंतरी या पिकाची स्थिती चांगली असताना किडीचा प्रादुर्भाव आणि पाऊस यामुळे तालुक्यातील सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा दिवाळी सणाच्या तोंडावर अडचणीत आला आहे. आधीच सुलतानी संकट त्यात अस्मानी संकट आल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. 

पाऊस पडल्याने खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने निम्यापेक्षा अधिक शेंगा गळून पडल्या आहेत. तर उर्वरित शेंगा भरत असताना ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्याने नदीकाठच्या अनेक पिकांना नुकसान पोहचले आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरु असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असताना शेतकऱ्यांनी जेमतेम जुळवा जुळव करून बियाणे आणली आहेत. त्यानंतर त्याची लागवड केली. सुरुवातीला पिके जोमात होती. मात्र पाऊस आणि हवामान यामुळे पिके अर्धे अधिक तर काही ठिकाणी सत्तर टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. यापुढे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 

जी स्थिती सोयाबीनची तीच स्थिती बाजरी आणि मक्याची झाली आहे. ३४६८.६६ हेक्टर बाजरी लागवड झाली आहे. मका ३२५६.३० हेक्टरवर लागवड झाली, मात्र यावर्षी बाजरी पीक शंभर नंबरी होते. तसेच दमदार वैरण आली होती. पाऊस झाल्याने आणि वातावरण खराब असल्याने पिके झोपली. वैरणही खराब झाली, त्यामुळे या पिकाला ५० टक्केपेक्षा अधिक फटका बसल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर खुळे यांनी सांगितले. कांदा पीक क्षेत्र २५० हेक्टर असून ९.२० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली, त्यात मध्यंतरी कांदे भाव वाढले आहे. १२ ते १५ हजार रुपये पाईलीने बियाणे शेतकऱ्यांनी घेतली आहे. मात्र, त्याचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. 
 
शेतकरी पांडुरंग खाडे म्हणाले, मुळा प्रवरा आढळा पट्ट्यात भातपीक जोमात होते. एकूण क्षेत्राच्या १८९८३ .२५ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. मात्र भंडारदरा, मुळा, आढळा पट्ट्यात अती पाऊस व तांबेरा रोगा पडल्याने भातपीक खराब झाले आहे. 

टोमॅटो उत्पादक शेतकरी महेश नवले म्हणाले, टोमॅटो, सोयाबीन, बाजरी, भाजीपाला, ऊस या पिकांना पाऊस व वातावरणाचा मोठा फरक बसला असून तांबेरा, उनी हुमणी रोग पडल्याने पिके सत्तर टक्के धोक्यात आहे. मुरुमाचे शेत असलेल्या ठिकाणी ऊसाची वाढ थांबली आहे. यावर्षी अगस्ती कारखान्यातील  ३०, ४० हजार टन ऊस हे कमी पडेल अशी स्थिती आहे. तर सोयाबीन, बटाटा ही बियाणे बनावट असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, तालुक्यात अतीपाऊस, भात आणि सोयाबीन पिकावर विविध प्रकारचे रोग पडले तर काही ठिकाणी बनावट बियाणे दिल्याने शेतकरी अडचणीत आहे. आधीच सुलतानी संकट त्यात अस्मानी संकट आल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. 

अकोल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी म्हणाले, भात पिकांवर तांबेरा रोग पडल्याने काही ठिकाणी बरंच नुकसान झाले आहे. बटाटे आणि भुईमूग पीक ही बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी अडचणीत आहे. तर सोयाबीन पिकाची स्थिती नाजूक आहे, याबाबत वरिष्ठाना अहवाल पाठविला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे आदेश आल्यावर पंचनामे करू. मका पीक सध्या पोटरी अवस्थेत आहे. भात पिकाचे सरासरी क्षेत्र १३४०० असून १८९८३.२५ हे क्षेत्रावर लागवड सुरु आहे. 

➢ बाजरी पिकाचे सरासरी क्षेत्र   ५००० हे. असून ३४६८.६६ हे क्षेत्रावर लागवड 
➢ मका  पिकाचे सरासरी क्षेत्र    ३५०० हे. असून ३२५६.३० हे क्षेत्रावर लागवड 
➢ नागली पिकाचे सरासरी क्षेत्र    ५०० हे. असून २६०  हे क्षेत्रावर लागवड झाली 
➢ खरीप तृणधान्य पिकाचे सरासरी क्षेत्र ५०० हे. असून २५२.७० हे क्षेत्रावर लागवड 
➢ मूग  पिकाचे सरासरी क्षेत्र      १५०  हे. असून ८३.४० हे क्षेत्रावर लागवड 
➢ उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र     ५० हे. असून ९१.३७ हे क्षेत्रावर लागवड 
➢ भुईमूग  पिकाचे सरासरी क्षेत्र  २०००  हे. असून ११३८.४१ हे क्षेत्रावर लागवड 
➢ कारळे पिकाचे सरासरी क्षेत्र     ५०० हे. असून २४२.४०  हे क्षेत्रावर लागवड 
➢ सोयाबीन  पिकाचे सरासरी क्षेत्र  ३५०० हे. असून १०५६२.८९  हे क्षेत्रावर लागवड 
➢ चारा  पिकाचे सरासरी क्षेत्र  १०२५  हे. असून २०८८.७०  हे क्षेत्रावर लागवड 
➢ कांदा  पिकाचे सरासरी क्षेत्र  २५०  हे. असून ९.२०  हे क्षेत्रावर लागवड

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com