पेंडशेतमधील शेतकरी आवणीसाठी अभयअरण्यातून लाकूड आणण्यासाठी गेले अन्‌...

In Akole taluka this technology was introduced in Pendshet for paddy cultivation
In Akole taluka this technology was introduced in Pendshet for paddy cultivation

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुका आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. मुळा आणि प्रवरा या मोठ्या नद्यांचा उगम याच तालुक्यातून होतो. अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य लाभलेला हा तालुका दऱ्याखोऱ्या व जंगलांनी बागायती शेतीने व्यापलेला आहे. या निसर्गसंपन्न तालुक्यात जन्मास आलेले काशिनाथ चेंडू खोले हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या पेंडशेत या गावचे आहेत. 

शिक्षण 10 वी पर्यंत झालेले. पत्नी सुमनबाई यांचे सोबत ते पेंडशेत येथे शेती सांभाळतात. काशिनाथ काका यांना १२ एकर क्षेत्रापैकी सहा एकर क्षेत्र अभयअरण्याला लागून असल्याने जंगली झाडांनी व्यापलेले आहे. उर्वरित सहा एकर क्षेत्र हे भात क्षेत्र आहे. बालपणापासूनच शेतीची प्रचंड आवड असलेले काशिनाथ काका शेतीच्या बाबतीत हुशार आणि तत्वनिष्ठ आहेत. पारंपरिक पद्धतीने भात लागवड होणाऱ्या या भागात त्यांनी एसआरटी सारखे तंत्रज्ञान आत्मसात करून भात शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडून आणला. त्यामुळे त्यांना तालुक्यातील शेतकरी ओळखू लागले. शेतीमध्ये कुठलाही बदल सहजासहजी होत नसतो. त्यासाठी अपार कष्ट आणि मेहनत घ्यावी लागतात. या सर्वातून काशिनाथ काका तावून सलाखून निघाले. पारंपरिक पद्धतीने भात लागवडीसाठी लागणारे मनुष्यबळ दरवर्षीचा प्रश्न बनला होता.

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भात लागवड या क्षेत्रांमध्ये होत असल्याने सर्वांनाच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. मजुरांचा तुटवडा जाणवतो. पारंपारिक पद्धतीने भात लागवडीसाठी सुमारे 30 मजूर प्रति एकर एवढे मनुष्यबळ लागते. याशिवाय रोपे तयार करण्यासाठी राबनी करने, त्यावर भाताचे बियाणे पेरून रोपवाटिका तयार करणे, रोपवाटिकेची निगा घेणे, रोपे लागवडी योग्य झाल्यानंतर त्यांची पुनर्लागवड करणे ही कामे आलीच. पारंपरिक पद्धतीने भाताची पुनर्लागवड करताना एकरी भातरोपांची संख्या मर्यादित ठेवणे अत्यंत कठीण असते. ओळीत लागवड न झाल्याने खतापासून बनवलेल्या ब्रिकेट खत देतांना मोठी अडचण निर्माण होते. त्याचबरोबर भात लागवडीअगोदर चिखलणी करणे व लागवडीनंतर काही दिवसांनी खुरपणी करणे इत्यादी कामे खूप कठीण बनतात. यावर पर्याय म्हणून काशिनाथ काकांनी एसआरटी पद्धतीने भात लागवडीची कास धरून मार्ग काढला. 

या तंत्रज्ञानाचा त्यांच्यापर्यंत झालेला प्रसार अतिशय मजेशीर आहे. खोले काकांना 12 एकर जमीन ही  कळसुबाई-  हरिश्चंद्रगड अभयअरण्याला लागून आहे. पारंपरिक भात लागवड म्हटल्यावर उन्हाळ्यामध्ये राबनी करणे आलेच. आवनीसाठी एके दिवशी शेतालगत असलेल्या अभयअरण्यातून लाकूडफाटा आणण्यासाठी खोले काका गेले. तिथे वनविभागाचे अधिकाऱ्यांनी त्यांना पाहिले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केली. त्यानंतर खोले काका व त्यांच्यात जोराचा वाद झाला.

दोघेही एकमेकांशी भांडू लागले. या भांडणाचे रुपांतर पुढे मोठे स्वरूप धारण करणार होते. मात्र वन अधिकारी एस. एन. रणाळकर डीएफओ नाशिक व आरएफओ बी. टी. पाटील यांनी खोले काकांनी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना जाणीव झाली की, राबनी न करता भात लागवड आपण करू शकलो तर जंगलांवर शेतकरी कुऱ्हाड चालवणार नाहीत. त्यामुळे जंगल वाचेल. म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील शेतीतज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांनी विकसित केलेले सगुना राईस टेक्निक अर्थातच एसआरटी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अभयारण्याच्याकडेला वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी नेले. अशाप्रकारे काशिनाथ काकांना वनविभागाच्या माध्यमाने एसआरटी भात लागवड तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. 2013 मध्ये उन्हाळ्यामध्ये या अभ्यास दौऱ्यात या तंत्रज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर खोले काकांना पारंपरिक पद्धतीतून बदल घडवून एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्याचा चंग बांधला. 

पहिल्यावर्षी शेत तयार करून सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर त्यांनी एसआरटी पद्धतीने भात लागवड केली. या पद्धतीने भात लागवड केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, ज्या जमिनीवर पारंपरिक पद्धतीने आठ पोते भात होतो. त्याच जमिनीवर त्यांना 12 पोते भात झाला होता. या प्रयोगातून त्यांना आत्मविश्वास मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सुमारे सहा एकर भात क्षेत्र एसआरटी पद्धतीने लागवड करण्याचे ठरवले. 2014 पासून त्यांनी त्यांचे संपूर्ण शेत एसआरटी पद्धतीने लागवडीखाली आणले. एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी तयार करायला लागणारे गादीवाफे त्यांनी बैलाच्या माध्यमाने तयार करून घेतले. एकदा तयार केलेले गादीवाफे तसेच ठेवले जातात. त्यामुळे प्रत्येकवर्षी नांगरट व चिखलणी करण्याचा खर्च वाचतो.

गादी वाफ्यांमध्ये ओलावा टिकून राहत असल्यामुळे पावसाने दडी मारल्यास पिक तग धरून राहते. त्यामुळे उत्पन्नात घट येत नाही. गादीवाफे भुसभुशीत राहण्यासाठी त्यांनी आपल्या शेतावरच गांडूळ खत निर्मितीची सुरुवात केली आहे. त्यासाठी दोन गांडूळ खतांच्या टाक्या बांधलेल्या आहेत. त्याचबरोबर पिकांना जीवामृत देता यावी म्हणून त्यांनी 200 लिटरचे दोन ड्रम शेतावर कायमस्वरूपी बसवलेले आहेत. जिवामृताची मात्रा ते भाताला चारवेळा देतात. भात पिकाच्या वाढ जोमाने होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते. याशिवाय नैसर्गिक पद्धतीने शेती करता यावी म्हणून शेताच्याकडेला व शेतात त्यांनी सुमारे 50  प्रकारचे व 1500 झाडे लागवड करून ती झाडे जतन केले आहेत. शिवाय डांगी प्रजातीच्या दोन गावठी गाई त्यांनी सांभाळल्या आहेत. 

एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अकोले तालुक्यातील भात शेतीला एक वेगळी दिशा दिलेली आहे. त्यांचा आदर्श घेऊन बायफ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या माध्यमाने एसआरटी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार या भागात केला जात आहे. अर्थातच त्यासाठी खोले काका हे मार्गदर्शकाची भूमिका नेहमीच बजावत आलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा प्राप्त होईल. खोले काका त्यांच्या कृतिशील शेती प्रयोगातून दिशादर्शक काम करत आहेत. म्हणूनच ते अकोले तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांचे कार्व्हर ठरलेले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com