कर्जतमध्ये घमासान ः राऊत यांचे आमदारांवर आरोप...मग नगरसेवक तोटे, घुले भडकले

Allegations against funds in Karjat Municipality
Allegations against funds in Karjat Municipality

कर्जत : आमदार रोहित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून महापुरुषांच्या स्मारकाचा निधी गटर व रस्त्याच्या कामासाठी वर्ग केला आहे. या कृत्याने रोहित पवार यांनी महापुरुषांचा अवमान केला आहे. तसेच व्यापारी संकुलाला खो घातला आहे. यामुळे त्यांनी कर्जतच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते व कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली.

राम शिंदे यांनी आणला होता निधी

राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार असताना येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. यानंतर येथे भाजपची सत्ता आली. यानंतर येथील नगरपंचायतीने राज्य सरकारकडे शहरातील अनेक नवीन कामांचे प्रस्ताव पाठवले. यामध्ये कर्जत नगरपंचायतीसाठी व्यापारी गाळयासह अद्ययावत इमारत मंजूर करण्यात यावी तसेच शहरात महापुरुषांची स्मारके उभारण्यात यावीत अशी मागणी केली. तत्कालिन पालकमंत्री राम शिंदे यांनी या कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला. यानंतर राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष निधी मंजूर केला.

हा निधी गटार व रस्ते या कामासाठी वर्ग केला. आमदार पवार यांनी महापुरुषांच्या कामासाठी आलेला निधी गटार व रस्त्यासाठी वर्ग करून महापुरुषांचा अवमान केला आहे.

बिनबुडाचे आरोप लोकांना ठाऊक आहेत 

भ्रष्टाचार लपवण्यासाठी महापुरुषांच्या नावाचा आधार घेत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे आमदार रोहित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत मात्र, कर्जतची सुज्ञ जनता हा डाव ओळखून अाहे. नेमके चौक सुशोभीकरण जनतेसाठी होते की स्वार्थासाठी याचे उत्तर त्यांनी द्यावे असे आवाहन नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या पूजा म्हेत्रे, नगरसेवक सचिन घुले, नगरसेवक डॉ.संदीप बरबडे आणि नागरसेविका मोनाली तोटे यांनी केले आहे.

येथील विरोधी नगरसेवकांनी पत्रकार परिषद वरील भूमिका व्यक्त केली. या वेळी संतोष म्हेत्रे व ओंकार तोटे उपस्थित होते.

भ्रष्टाचार लपवण्यासाठीच अटापिटा

सचिन घुले म्हणाले, ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज मंदिर परिसरातील सुशोभीकरणासाठी असलेले पथदिवे कित्येक दिवसापासून बंद आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावनांचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. तो त्यांचा अवमान नव्हे काय? शहरातील सर्व कामे त्यांच्याच नात्यातील, मर्जीतील ठेकेदारांनी केली. त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्या सर्व कामांची चौकशी व्हावी. उपनगराध्यक्ष राऊत व सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. ते निष्क्रियता लपविण्यासाठी ते बेताल आरोप करीत आहेत.

निधी अखर्चित का ठेवला

पूजा म्हेत्रे म्हणाल्या, ही सर्व कामे 2018ला मंजूर असताना तसेच सर्व काही सत्तास्थाने तुमच्याकडे असताना काम का झाले नाही? निधी दोन वर्षे अखर्चित का राहिला? याचे उत्तर प्रथम उपनगराध्यक्ष यांनी द्यावे. शहरातील पाच चौक सुशोभीकरण कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाला. ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. त्यातील म्हसोबा गेट व कापरेवाडी वेस येथील कामे न करताच बिल काढले, असा गंभीर आरोप या वेळी त्यांनी केला.

डॉ संदीप बरबडे म्हणाले, जुनी नगरपंचायत येथे जागा अत्यंत कमी अाहे. वीस ते पंचवीस गाळे तेथे झाले असते. मात्र, तीनशे ते चारशे गळ्यांची ही मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे आम्ही चारही नगरसेवकांनी केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com