खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करुन घेतले नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप

आनंद गायकवाड
Saturday, 8 August 2020

संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर सुरु असल्याच्या काळात एका रुग्णाला जागा नसल्याचे कारण देत, शहरातील खासगी व शासकिय रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर सुरु असल्याच्या काळात एका रुग्णाला जागा नसल्याचे कारण देत, शहरातील खासगी व शासकिय रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक विश्वास मुर्तडक यांनी आरोप केला आहे. संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे केली आहे.

सत्ताधारी पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने रुणालयांच्या मनमानी विरोधात आंदोलनाचा पवित्र घेतल्याने खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरातील इंदिरानगर प्रभागातील एका 58 वर्षाच्या व्यक्तीला सर्दी व ताप होता. गुरुवार ( ता. 6 ) रात्री त्यांना उपचारासाठी शहरातील एका मोठ्या रुग्णालयामध्ये नेले असता. तेथे जागा नसल्याने दुसरीकडे नेण्यास सांगण्यात आले. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात उपचार करुन, दुसऱ्या खासगी उपचार केंद्रात नेण्याचा सल्ला दिला. मात्र तेथेही जागा नसल्याचे कारण देत प्रवेश न मिळाल्याने, या रुग्णाला चंदनापुरी घाटातील कोरोना उपचार केंद्रात घेवून जात असताना, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्या असल्याचे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

या रुग्णाच्या मृत्यूला उपचार करण्यास नकार देणारी रुग्णालये जबाबदार असल्याचा आरोपही मुर्तडक यांनी केला आहे. तसेच कोरोनावरील उपचारासाठी प्रशासनाने मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेड व व्हेंटीलेटरची संख्या जाहीर करण्याची मागणी केली असून, याबाबत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलनाचा व त्याला प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा मुर्तडक यांनी निवेदनात दिला आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मगरुळे म्हणाले, या रुग्णाने चार पाच दिवसांपासून खासगी दवाखान्यात उपचार घेतल्याचे समजले. शेवटी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 45 वर आल्यानंतर त्यांची धावपळ सुरु झाली होती. संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील कोवीड सेंटरमध्ये 90 खाटांची व्यवस्था आहे. तेथे जागा होती. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी धामणगावच्या एसएमबीटी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून संदर्भपत्र घेतले होते. शहरातील रुग्णालयांचे डेड ऑडीट करण्यासाठी वैद्यकिय अधीक्षक व मुख्याधिकारी यांचे पथक नेमले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alleged death of patient due to non admission in private and government hospitals