esakal | आंबेडकर म्हणतात, ऊस तोडणी मजुरांसाठी स्वतंत्र बोर्ड हवं
sakal

बोलून बातमी शोधा

Ambedkar says there should be a separate board for sugarcane harvesters

ऊसतोड मजुरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कायदा करून माथाडी कामगारांच्या बोर्डाप्रमाणे नवीन बोर्डाची स्थापना करावी.

आंबेडकर म्हणतात, ऊस तोडणी मजुरांसाठी स्वतंत्र बोर्ड हवं

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी : वारंवार ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकदारांच्या दरवाढीचा प्रश्न निर्माण होतो. विधानसभेत यासंदर्भात कायदा निर्माण होणे गरजेचे आहे.

ऊसतोड मजुरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कायदा करून माथाडी कामगारांच्या बोर्डाप्रमाणे नवीन बोर्डाची स्थापना करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख, माजी खासदार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी कासार येथे आज ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुकदारांच्या मेळाव्यात ऍड. आंबेडकर बोलत होते. धनराज वंजारी, युवराज बांगर, अनिल डोंगरे, प्रतिक बारसे, दादा खेडकर आदी उपस्थित होते. 

ऍड. आंबेडकर म्हणाले, ""ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासठी बोर्ड स्थापन करण्यासाठी (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाली होती. बोर्ड स्थापन करण्यासाठी ते अनुकुल होते. मात्र, त्यांच्यानंतर आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. पंकजा मुंडे यांना विरोधक त्रास देत असून, पक्षातूनही विरोध आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांवर मुंडे यांनी जास्त आक्रमक व्हावे.'' 

साखर कारखानदार, संचालक मंडळाचे राजकारण कारखानदारीवर चालते. त्यांना ऊसतोडणी मजूर, मुकादम आणि वाहतुकदारांची गरज आहे. त्यामुळे कारखान्यांवर जाण्याची घाई करू नका. अजून दहा दिवस संप लावून धरा, त्यांना सांगा, करार करा, आम्ही येतो, असे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले. 

संपादन - अशोक निंबाळकर