अमृतवाहिनी बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

आनंद गायकवाड
Saturday, 14 November 2020

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या नवीन वैभवशाली इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अमित पंडित होते.

संगमनेर ः सहकारातून संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. अमृतवाहिनी नागरी सहकारी बँकेने सातत्याने शेतकर्‍यांना मदत केली असून, बँकेची गुणवत्तापूर्वक वाटचाल कौतुकास्पद ठरत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या नवीन वैभवशाली इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अमित पंडित होते.

ते म्हणाले, कोरोनाच्या संकटाचा सामना आपण सर्व सुमारे आठ महिन्यांपासून करीत आहोत. या संकटावर आपण काही प्रमाणात अंकुश ठेवण्यात यशस्वी झालो आहोत, मात्र प्रत्येक सणानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

दिवाळीच्या काळात कोरोना प्रादुर्बाव टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराच्या त्रिसूत्रीचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. अमित पंडित म्हणाले, मागील 25 वर्षाच्या दमदार वाटचालीत संस्थेने एटीएमच्या सुविधेसह तळेगाव, घारगाव शाखा उभारल्या आहेत. ही वैभवशाली इमारत बँकेच्या उज्ज्वल इतिहासाची साक्षिदार ठरणार आहे.

या वेळी नवीन वास्तूच्या प्रवेशद्वारावरील दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर यांच्या हस्ते तर मोझॅक टाईल्समध्ये साकारलेल्य़ा मंत्री थोरात यांच्या पूर्णाकृती चित्राचे अनावरण उद्योजक राजेश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बाबासाहेब ओहोळ, दिलीप पुंड, कांचन थोरात, सुनंदा जोर्वेकर, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, उपाध्यक्ष दत्तात्रेय खुळे, किरण पाटील, डॉ. जयश्री थोरात, सर्व संचालक, व्यवस्थापक रमेश थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम करणार्‍या प्रशासनातील अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण वाघ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सारेगमप फेम विश्वजित बोरवणकर यांचा सुरेल संगीत रजनीचा कार्यक्रम झाला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrutvahini Bank strengthened the rural economy