अमृतवाहिनी संस्थेकडून दुध उत्पादक सभासदांना साखर वाटप

शांताराम काळे
Monday, 16 November 2020

अमृत वाहिनी आदिवासी सहकारी दूध संस्थेने १२० दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन टक्के रिबित व प्रत्येकी १० किलो साखर देऊन त्यांची दिवाळी आनंदाची केली आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील अमृत वाहिनी आदिवासी सहकारी दूध संस्थेने १२० दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन टक्के रिबित व प्रत्येकी १० किलो साखर देऊन त्यांची दिवाळी आनंदाची केली आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मुंढे यांनी २००५ मध्ये दूध संस्थेची स्थापना करून आदिवासी भाग असलेल्या शेलद, मुंढे वाडी, मुठेवाडी, घिगेवाडी, चींचवणे, मेचकरवाडी, सकिरवाडी आदी दहा गावातील दूध संकलन करून २००० लिटर दूध अमृत्सागर दूध संघाला पाठवून दहा वर्षांपासून प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेतात. 

अमृतवाहिनी दूध संस्थेने रोजगारासाठी नारायणगाव, अकोले, जुन्नर येथे जाणाऱ्या गरीब आदिवासी मजुरांना ५० हजार ते चार लाखापर्यंत केवळ एक टक्केवर कर्ज देऊन दुभत्या गायी घेऊन दिल्या एक गायी पासून सुरुवात केलेल्या ज्ञानेश्वर घीगे या गवंडी मजुराने आपल्या गोठ्यात १९ गायी सांभाळून त्यापासून त्याला वर्षाला चार ते पाच लाख रुपये नफा मिळतो. त्याच्यासोबत त्याचे सर्व कुटुंब सकाळपासून काम करून २०० लिटर दूध संस्थेला पाठवत आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक तरुण बेरोजगारी झटकून टाकत रोजगरिकडे वळले आहे. 

बाळासाहेब मुंढे म्हणाले, मी नोकरीच्या मागे न लागता अमृत वाहिनी दूध संस्था स्थापन केली. तत्कालीन आमदार व अमृत्सगर दूध संस्थेचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी मला बरक्युलार मशीन दिले. त्यामुळे दूध खराब होत नाही. तसेच दूध काढण्यासाठी २५ मशीन दिल्याने या परिसरातील दीडशे शेतकरी दूध व्यवसाय करत असून दीड ते दोन हजार दूध संकलन होऊन येथील गरीब आदिवासी, तरुण, महिला यांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. 

आज प्रत्येक कुटुंबात किमान ५० लिटर दूध उपलब्ध होते. गावात बिगर दुधाचा चहा होत नाही आमचे उद्दिष्ट पाच हजार लिटरचे असून प्रत्येक गावात दुधाळ जनावरे देण्याचा आमचा मांनस आहे. तर ज्ञानेश्वर  घिगे यांनी मी मजुरी करत होतो आज महिन्याला चाळीस हजार कमवतो, असे सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrutvahini distributes sugar to milk producing members