बालकांना आहार देईचा कसा? "या' जिल्ह्यात अंगणवाडीसेवीकांपुढे प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

अंगणवाडी सेविकांना सहा महिन्यापासून आहारासाठी खर्च केलेले पैसे मिळाले नाहीत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उसनवारी घेऊन व किराणा दुकानदार यांना विनंती करून उधारी ठेवून, तर काही अंगणवाडीसेविकांनी व्याजाने पैसे घेऊन आतापर्यंत लाभार्थींना आहार दिला. परंतू जिल्हा व प्रकल्प कार्यालयाने, अमृत आहाराचे थकीत पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खात्यावर दिले नाहीत. 

अकोले (अहमदनगर) : अंगणवाडी सेविकांना सहा महिन्यापासून आहारासाठी खर्च केलेले पैसे मिळाले नाहीत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उसनवारी घेऊन व किराणा दुकानदार यांना विनंती करून उधारी ठेवून, तर काही अंगणवाडीसेविकांनी व्याजाने पैसे घेऊन आतापर्यंत लाभार्थींना आहार दिला. परंतू जिल्हा व प्रकल्प कार्यालयाने, अमृत आहाराचे थकीत पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खात्यावर दिले नाहीत. 
डिसेंबरचे मानधन व सहा महिन्याच्या अमृत आहाराचे थकित पैसे न मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविका स्वत: आर्थिकदृष्ट्या कुपोषित झाल्या आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे आदिवासी विभागाने अद्याप रक्कम वर्ग न केल्यामुळे अकोले व राजूर प्रकल्पाचे 69 लाख थकीत असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्‍यातील 393 अंगणवाडीमार्फत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतून 2496 गरोदर व स्तनदा मातांना व 10 हजार 195 बालकांना आहार वाटप केल्याची माहिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांनी दिली. 
अकोले तालुका आदिवासी व अतिदुर्गम तालुका असून तालुक्‍यात कोरोना व लॉकडाऊनमुळे आहार वाटप योजनेस खीळ बसली. तालुक्‍यातील प्रत्येक अंगणवाडीत पूरकआहार,अमृत आहार योजनेच्या माध्यमातून शिजवून न देता घरपोहच आहार वाटप करण्यात येत असल्याचे चित्र आहे. या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाही याप्रमाणे सहा महिन्यातील आहार देण्यात येतो. अकोले व राजूर येथे बालविकासप्रकल्प कार्यालय आहे. त्याअंतर्गत राजूर येथे सरपंच गणपत देशमुख, ग्रामसेवक बाळासाहेब आंबरे, गंगुबाई देशमुख यांच्या हस्ते आहार वाटप झाले. अनुसूचितक्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमीवजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्‍यक होते. या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये- डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला याचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात आली. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. तर अकोले व राजूर प्रकल्पाचे 69 लाख थकीत असल्याचे अंगणवाडी सेविका सांगित आहेत. 
आंगणवाडी सेविका नंदा देशमुख म्हणाल्या, सहा ते सात महिन्यापासून अनुदान न आल्यामुळे उसनवार व उधारी करून गरोदर माता स्तनदा माता, चोथ्या बालक यांना आहार नियमित देत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadis in Ahmednagar do not get money for nutrition