esakal | पुण्यात काम केलेले अनिल कटके गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकपदी
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Katke worked in Pune as an inspector of Kopargaon Crime Investigation Branch

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकपदी कोण येणार, याची उत्सुकता अखेर संपुष्टात आली.

पुण्यात काम केलेले अनिल कटके गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकपदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकपदी कोण येणार, याची उत्सुकता अखेर संपुष्टात आली. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांची शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याचा आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला. कटके यांनी काल रात्रीच पदभार स्वीकारला. 

1996च्या बॅचचे फौजदार असलेले कटके मूळचे पुणे जिल्ह्यातील गोलेगाव (ता. शिरूर) येथील रहिवासी. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून 1996मध्ये त्यांनी एम. एस्सी.(ऍग्री) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्याच वर्षी त्यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. 

प्रशिक्षणानंतर कटके यांनी तब्बल 18 वर्षे मुंबई पोलिस दलात उपनिरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक या पदांवर काम केले. मलबार हिल, आग्रीपाडा, नागपाडा, ताडदेव, भायखळा, चेंबूर, गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी पथकात त्यांनी काम केले. त्यानंतर कटके यांना पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर व अक्कलकुवा येथे काम केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यात पाठविले. सन 2017पासून त्यांनी नगर जिल्ह्यातील आश्‍वी, शिर्डी व कोपरगाव तालुका या पोलिस ठाण्यांमध्ये काम केले. 

पोलिस अधीक्षकांनी अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही जारी केले. त्यानुसार, घारगाव पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांची श्रीरामपूरला अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात, कर्जत पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक मनोहर इडेकर यांची नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात बदली झाली. सहायक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर कायंदे यांना पाथर्डी पोलिस ठाणे, सुनील बडे यांना जामखेड पोलिस ठाणे, शाहीदखान पठाण यांना नगरमधील बीडीडीएस, दिलीप तेजनकर यांना श्रीगोंदे पोलिस ठाण्यात, तर दिलीप शिरसाट यांना जिल्हा विशेष शाखेत नियुक्‍ती देण्यात आली आहे. 

पोलिस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांची तोफखाना पोलिस ठाण्यातून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात, पंकज शिंदे यांची भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली. नव्याने हजर झालेले पोलिस उपनिरीक्षक रणजित गट यांना श्रीगोंदे पोलिस ठाणे, मधुकर शिंदे यांना राहुरी पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली. अनिल गाडेकर यांना ट्रायल मॉनिटरिंग सेल, अशोक लाड यांना शिर्डीतील साईमंदिर सुरक्षा, नवनाथ दहातोंडे यांना मानवसंसाधन विभाग, दीपक पाठक यांना एमआयडीसी पोलिस ठाणे, शैलेंद्र जावळे यांना अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, सज्जन नाहेडा यांना जामखेड पोलिस ठाण्यात, तर धीरज राऊत यांना घारगाव पोलिस ठाण्यात नियुक्‍ती देण्यात आली. 

"टीम वर्क' अधिक घट्ट करण्यावर भर ः कटके 
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आपल्याला जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकपदावर काम करण्याची संधी दिली. त्यांच्या कल्पनेतील "पब्लिक पोलिसिंग' व गुन्हेगारी निर्मूलनाच्या मोहिमेसाठी आपण आपल्या आतापर्यंतच्या पोलिस सेवेतील अनुभवाचा उपयोग करू. पोलिस व जनतेतील संवाद अधिक वृद्धिंगत होऊन त्याचा उपयोग गुन्हेगारी निर्मूलनाच्या कामात कसा करता येईल, यासाठी पोलिस यंत्रणेचे "टीम वर्क' वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक घट्ट करण्यावर आपण भर देणार असल्याचे कटके यांनी "सकाळ'ला सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर