भैया गेले... माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

 अशोक निंबाळकर
Wednesday, 5 August 2020

शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

अहमदनगर: शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नगर शहराच्या आमदारकीची धुरा त्यांनी २५ वर्षे सांभाळळी. शिवसेनेचा वाघ असाच त्यांचा लौकिक होता. मोबाईल आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. सभा चालू असतानाही ते मोबाईल रिसिव्ह करीत असत. समोरचा सभेत भैया बोलत आहेत असा समजायचा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगर शहरात येऊन त्यांनी इतकी वर्षे जनसेवा केली. कोणत्याही किरकोळ कारणासाठी ते लोकांसाठी धावून जात.

राठोड कुटुंब हे मूळ राजस्थानातील आहे. त्यांचे वडील नगरमध्ये स्थायिक झाले. १२ मार्च १९५० रोजी अनिल राठोड यांचा जन्म झाला. पुढे त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. वडिलांच्या व्यवसायात मदत केली. त्यांना वकील व्हायचे होते. परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना ते शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. नगरमध्ये त्यांनी प्रारंभीच्या काळात पावभाजी सेंटर सुरू केले होते. त्यातून त्यांचा लोकांसोबत संपर्क येत गेला. हिंदू एकता आंदोलनात ते सहभागी झाले. शिवसेनेने त्यांच्यातील गुण हेरले आणि शहर प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधीही दिली होती. नगर शहरासह जिल्ह्यात ते भैया या टोपण नावाने परिचित होते. नगर जिल्हा साखर सम्राटांचा म्हणून ओळखला जातो. परंतु सर्वत्र राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे आमदार निवडून यायचे. मात्र, नगरमध्ये शिवसेनेची सीट पक्की समजली जायची. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजसेवा केली. कोरोना महामारीतही त्यांनी लोकसंपर्क कमी केलेला नव्हता. ते रूग्णालयात दाखल होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Rathod passed away due to cardiac arrest in Nagar