टाकळीभानमध्ये भरणार जनावरांचा बाजार

गौरव साळुंके
Saturday, 24 October 2020

दर रविवारी टाकळीभान येथील खिर्डी रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या आठवडे बाजारच्या मैदानावर जनावरांचा बाजार भरणार आहे. 

श्रीरामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात दर रविवारी जनावरांचा बाजार भरविण्याचा निर्णय संचालक मंडळाने नुकताच घेतला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

बाजार समितीने टाकळीभान उपबाजारांतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भुसार धान्य बाजार, कांदा बाजारात स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भव्य व्यापारी संकुल सुविधा सुरू केली आहे. तसेच, आता जनावरांचा आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या सुविधेत वाढ केली आहे.

दर रविवारी टाकळीभान येथील खिर्डी रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या आठवडे बाजारच्या मैदानावर जनावरांचा बाजार भरणार आहे. 

परिसरातील शेतकऱ्यांना यापूर्वी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी बाहेरगावी जावे लागत होते. त्यात वेळ आणि पैसाही खर्च होत होता. त्यामुळे टाकळीभान परिसरात बाजार भरविण्याचा निर्णय बाजार समितीने घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

अधिकचा खर्च आणि वेळही वाचणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे येथील बाजारात खरेदी-विक्रीसाठी आणावीत, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. बाजार समितीमार्फत व्यापारी व शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास बाजार समिती प्रशासन प्रयत्नशील आहे.

सर्व व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, माजी सभापती नानासाहेब पवार, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal market to be filled in Taklibhan