नगर जिल्ह्यात जनावरांना मिळणार "ओळख"

दौलत झावरे
Saturday, 3 October 2020

जिल्ह्यात फक्त 14 लाख 40 हजार जनावरांनाच्या कानांना टॅग करायचे असून त्यास सुरवात झालेली आहे. जिल्ह्यातील 5102 जनावरांच्या कानांना टॅग करून लाळ्या खुरकत लसीकरण करण्यात आलेले आहे.

नगर : केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजना व आता राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनावरांच्या कानांना बारा अंकी नंबरचा टॅग लाऊन या जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाइन अपलोड करून लाळ्याखुरकत लसीकरण केले जात आहे.

या टॅगच्या माध्यमातून जनावराचे लसीकरण व चोरीला गेल्यास त्याचा शोध घेणे सुलभ होणार आहे. शेतकऱ्याचे पशुधन अपडेट होणार असून, एका क्‍लिवर जनावरांची माहिती मिळणार आहे. 

केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत 2018मध्ये जनावरांच्या कानांना बारा अंकी नंबरचा टॅग लावून या जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाइन अपलोड करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे एक लाख 65 हजार 142 जनावरांच्या कानाला टॅग लावण्यात आलेले आहे. सध्या लाळ्या खुरकतचे लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. या लसीकरणा दरम्यान जनावरांच्या कानांना टॅग लावणे सुरु करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात एकूण 16 लाख 48 हजार जनावरे आहेत. यामध्ये दोन लाख 31 हजार म्हैस वर्ग व उर्वरित गाय वर्ग आहे. या सर्व जनावरांच्या कानांना आता शासनातर्फे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत टॅग करण्यास सुरवात झालेली आहे.

यामध्ये जिल्ह्यात फक्त 14 लाख 40 हजार जनावरांनाच्या कानांना टॅग करायचे असून त्यास सुरवात झालेली आहे. जिल्ह्यातील 5102 जनावरांच्या कानांना टॅग करून लाळ्या खुरकत लसीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरित जनावरांना टॅग व लसीकरण करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सुरु आहे. 

जिल्ह्यात जनावरे चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. जनावरांच्या कानाला टॅग असल्यामुळे जनावरे नेमके कोणाचे आहे, याचा बोध टॅगमुळे होणे शक्‍य होणार आहे. त्याबरोबरच जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना त्याचा फायदा होणार आहे. जनावराच्या मूळ मालकाचा त्यातून उलगडा होऊन जनावरे किती वर्षांची झालेली आहेत. याची माहिती मिळणार आहे. 
पशुपालकांची अशी होणार मदत शासनाकडून अनेक योजना पशुपालकांसाठी राबविल्या जात आहे. त्याची माहितीबरोबरच जनावरांच्या लसीकरण, औषध पुरवठा व कृत्रिम रेतन आदी पशुपालकांपर्यंत वेळेत पोहचून त्यांना मदत वेळेत पोहचणे शक्‍य होणार आहे. साथीचे आजार पसरल्यानंतर प्रशासनालाही शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे त्यामुळे शक्‍य होणार आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animals to get "identity" in Nagar district