अण्णांनी घेतली रिटायर्डमेंट ः आता बास, मी थांबतो, कार्यकर्त्यांनी कंबर कसावी

एकनाथ भालेकर
Monday, 26 October 2020

स्वत:साठी जगताना, माझा शेजारी, माझा गाव, माझा समाज, यांच्यासाठी माझे काही तरी कर्तव्य असल्याची जाणीव ठेवून जे जगतात, ती माणसे खऱ्या अर्थाने जीवन जगत असतात. त्यातून मिळणाऱ्या अखंड आनंदाला कुठलीही सीमा नाही,'' असे हजारे यांनी सांगितले. 

राळेगणसिद्धी : ""गावात 1975मध्ये कामाला सुरवात केली. जवळपास 45 वर्षांचा काळ लोटला. गावातील सगळे कार्यकर्ते आज जे काम करीत आहेत, ते पाहून, प्रत्यक्षात काम करताना जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा अधिक आनंद आता होतो. यापुढेही मी काम सुरू ठेवले, तर कार्यकर्ते गहाळ पडतात. तसे होऊ नये, यासाठी राळेगणसिद्धीच्या कामातून हळूहळू निवृत्त होत आहे,'' अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. 

विजयादशमीचे औचित्य साधत, पद्मावती मंदिरात कोरोना संकटामुळे सात महिन्यांनी प्रथमच काल (रविवारी) हजारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आठवणींना उजाळा दिला.

हजारे म्हणाले, ""गावात एकाच्या घरी मोटारसायकल आली तरी सगळे गाव पाहायला जमायचे, अशी परिस्थिती होती. पाणलोटक्षेत्र विकासामुळे आज गावाची परिस्थिती बदलली. सामुदायिक विवाह चळवळ 1980मध्ये सुरू केली. त्या वेळी पाणीटंचाई असल्याने तहसीलदारांना सांगूनही पाण्याचे टॅंकर आले नाही. मी उपोषण सुरू केल्यावर, डोक्‍यावर हंडे घेऊन महिला आंदोलनात आल्या. नंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येऊन माफी मागितली.'' 

""मंदिरात सेवा करताना, आपले गावसुद्धा एक मंदिर असून, जनता सर्वेश्वर आहे. या जनतेतील दुःखी, पीडितांची सेवा खरी ईश्वराची पूजा आहे. माणसे करोडपती होऊ द्या. फक्त स्वतःसाठी जगणारी माणसे कायमचीच मरतात. करोडपती, लखपतींची कधीच जयंती साजरी होत नाही. समाजासाठी जगतात त्यांची होते.

स्वत:साठी जगताना, माझा शेजारी, माझा गाव, माझा समाज, यांच्यासाठी माझे काही तरी कर्तव्य असल्याची जाणीव ठेवून जे जगतात, ती माणसे खऱ्या अर्थाने जीवन जगत असतात. त्यातून मिळणाऱ्या अखंड आनंदाला कुठलीही सीमा नाही,'' असे हजारे यांनी सांगितले. 

सहायक व विक्रीकर आयुक्त डॉ. गणेश पोटे, उद्योजक सुरेश पठारे, माजी उपसरपंच लाभेश औटी, सुरेश दगडू पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, उद्योजक भागवत पठारे, सुनील हजारे, दादा पठारे आदी उपस्थित होते. 
 

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट उभारा 
गावातील हुशार व होतकरू मुला-मुलींच्या उच्चशिक्षणात पैशांअभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सात-आठ जणांचा ट्रस्ट स्थापन करावा. गावातून 10 लाख लोकवर्गणी जमा झाली, तर माझे स्वतःचे अडीच लाख रुपये ट्रस्टसाठी देईन. दर वर्षी त्यातून मदत होऊन मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी सूचना हजारे यांनी केली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare retires from Ralegan Siddhi work