
वाईनविक्री निर्णयाविरोधात हजारे उपोषणाच्या तयारीत
पारनेर : राज्य सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. त्याच बरोबर राज्यभरात त्यांचे कार्यकर्ते या निर्णयाच्या विरोधात एकाच वेळी तीव्र जनआंदोलन उभारणार आहेत. तशा अशयाचे पत्र हजारे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना तीन फेब्रुवारीस पाठविले आहे. आजही पुन्हा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्मरणपत्र पाठविले आहे.
हजारे यांनी पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले. मात्र, त्याला उत्तर आले नाही. त्या मुळे मी राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषण करणार आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल. तरूण पिढी ही खरी देशाची संपत्ती आहे. त्यातूनच उद्याचे महापुरूष तयार होणार आहेत. मात्र, सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयामुळे युवाशक्तीवर काय परिणाम होईल, याचा सरकारने विचार केला नाही.वाईन समाजाला घातक आहे, हे छोटा मुलगा सुद्धा सांगू शकेल. परंतु राज्य चालविणा-यांना कळू नये हे दुर्दैवी आहे.
आमच्या गावात पन्नास वर्षांपूर्वी पस्तीस दारूभट्ट्या होत्या. गेल्या २२ वर्षांत गावात विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखासुद्धा मिळत नाही. आणि सरकार मात्र सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन ठेवण्याचा निर्णय घेते हे मोठे दुर्देव आहे.
सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी माझ्याप्रमाणे उपोषण करू नये. राज्यातील अनेक संस्था व संघटनांनी वाईनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पक्षविरहीत समाज, राज्य आणि राष्ट्र हिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठविण्यासाठी राज्यात विभागवार बैठक आयोजित करणार आहे.
-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
Web Title: Anna Hazare Strike Against Wine Decision Parner Ahmednagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..