
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा.
राळेगण सिद्धी (अहमदनगर) : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा. निवडणुक आयोगाप्रमाणे स्वायत्त कृषीमुल्य आयोगाची स्थापना करावी व इतर शेतऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात गतवर्षी केंद्र सरकारने लेखी आश्वासन देऊनही अद्यापही पुर्तता केली नसल्याने शेतक-यांच्या मागण्यांसाठी आपण पुन्हा उपोषण आंदोलनाचा विचार करीत आहे.
उपोषणाचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सोमवारी (ता. १४) पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. हजारे यांनी पत्रात म्हंटले आहे की, गतवर्षी शेतक-यांच्या मागण्यांवर उपोषण केल्यानंतर ५ फेब्रुवारी २०१९ ला तत्कालिन केंद्रिय कृषीमंत्री राधा मोहन, माजी केंद्रिय मंत्री सुभाष भामरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे येऊन केंद्र सरकार तर्फे लेखी आश्वासन दिले होते.
त्यानुसार कृषीमुल्य आयोगाला निवडणुक आयोगाप्रमाणे स्वायत्त संविधानात्मक दर्जा देणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट ( C2+50) निर्धारीत करणे, भाजीपाला, फळे व दुध यांना योग्य भाव ( MSP ) देणे, ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर यासारख्या पाणी बचत करणा-या सिंचन साधनांना ८० टक्के अनुदान देणे यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करून ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत सदर समिती अहवाल देईल व या समितीच्या अहवालानुसार शेतक-यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार कार्यवाही करील असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, या लेखी आश्वासनाची अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे गतवर्षी ५ फेब्रुवारीला थांबवलेले उपोषण पुन्हा सुरू करण्याचा आपण विचार करीत आहोत. उपोषणाची तारीख व ठिकाण लवकरच कळवू. असा इशारा हजारे यांनी दिला आहे. तत्कालीन केंद्रिय कृषीमंत्री राधा मोहन यांच्या लेखी आश्वासनाचे पत्रही हजारे यांनी तोमर यांना पाठविलेल्या पत्रासोबत जोडले आहे.
२०१९ मध्ये हजारे यांनी शेतक-यांच्या विविध मागण्यांवर उपोषण केले होते. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालिन केंद्रिय कृषीमंत्री राधा मोहन , माजी केंद्रिय मंत्री सुभाष भामरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे हजारे यांच्या तब्बल ६ तास चर्चा केली होती. या वेळी दिलेल्या लेखी आश्वासनांची पुर्तता न झाल्याने हजारे यांनी पुन्हा उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर