अण्णा शिवसेनेवर कडाडले! विसरू नका, मी तुमचे भ्रष्टाचारी मंत्री घरी घालवलेत

एकनाथ भालेकर
Saturday, 30 January 2021

हजारे म्हणाले, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कशी पाठीशी घातले. याची मी सर्व माहिती देईल. समाज व देशाच्या वेगवेगळ्या विषयावर मी आंदोलने केले.

राळेगण सिद्धी : ज्या ज्या वेळी समाजात अन्याय, अत्याचार होतो. त्या त्या वेळी त्या विरोधात  समाज, राज्य व राष्ट्र हितासाठी मी आंदोलने करीत आलोय. पक्ष, पार्ट्या मी कधी पाहत नाही. तुमच्या काळात तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत होतात तेव्हाही मी आंदोलने केले.

या वेळी तुमचे मंत्री घरी गेले ना , विसरलात काय? असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिवसेनेला केला आहे.
हजारे यांनी आंदोलन स्थगित करण्याची भुमिका घेतल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात " कॉंग्रेसच्या काळात आंदोलने केली आता काय रामराज्य आलं काय ? " अशी टिका हजारे यांच्यावर करण्यात आली. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता हजारे यांनी त्यांची सडेतोड भूमिका मांडत शिवसेनेवर बोच-या शब्दांत टिकास्र सोडले.

हजारे म्हणाले, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कशी पाठीशी घातले. याची मी सर्व माहिती देईल. समाज व देशाच्या वेगवेगळ्या विषयावर मी आंदोलने केले. दिल्लीतील भाजपच्या केंद्र सरकारविरोधात सन २०१४ पासून अनेक वेळा पत्रव्यवहार करून या  सरकार विरोधात आतापर्यंत माझी सहा आंदोलने झाली आहेत.  

दिल्लीतील रामलिला  व जंतरमंतर वर वन रॅंक वन पेन्शनसाठी व  भुमी अधिग्रहण बिलाविरोधात तसेच शेतक-यांचे प्रश्न व लोकपाल - लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणीसाठी आंदोलन केले. तसेच राळेगणसिद्धीतही सन २०१९ मध्ये आंदोलन केले. हे त्यांना माहित नाही काय असा सवाल करत हजारे यांनी सामनाच्या अग्रलेखातील टिकेला उत्तर दिले.

 

समाजातील अन्यायाविरोधात तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात गेल्या चाळीस वर्षांत आजपर्यंत २० वेळा उपोषण केले. छोटी मोठी अनेक आंदोलने केलीत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले. त्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपचेही आहेत. सर्वच पक्षांविरोधात माझी आंदोलने झाली आहेत.  मी  पण पक्ष पार्ट्या कधी पाहून कधी आंदोलने केली नाहीत.

- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare's criticism of Shiv Sena