esakal | अण्णांचे स्पष्टीकरण ः छे निवृत्ती कसली घेतोय, कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनासाठी तसं बोललो
sakal

बोलून बातमी शोधा

Anna revealed about the retirement

विजयादशमीला पद्मावती मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधताना राळेगणसिद्धीतील आपले कार्यकर्ते चांगले काम करीत असल्याचा आनंद होत आहे. आता मी गावातील कामातून हळूहळू निवृत्त होतो, असे हजारे म्हणाले होते.

अण्णांचे स्पष्टीकरण ः छे निवृत्ती कसली घेतोय, कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनासाठी तसं बोललो

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी : गतवर्षी डिसेंबरपासून मौन आंदोलन व कोरोना काळ अशा वर्षभरात मी गावात कधी लक्ष दिले नाही. पण कार्यकर्त्यांनी अनेक कामे खूप चांगली केली आहेत. त्याचा मला नक्कीच आनंद वाटला. माझी गावातील जबाबदारी कमी करून कार्यकर्त्यांवर सोपवायची एवढेच ठरविले. माझे गाव, समाज व देश यांची सेवा करण्याचे ध्येय ठरलेले आहे. सेवेतून निवृत्ती घेऊन करणार काय, असे सांगत शरीरात प्राण आहे तोपर्यंत गाव, समाज व देशाची सेवा करण्यासाठी मी माझे जीवन देणार असल्याचा निर्धार कायम ठाम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.

विजयादशमीला पद्मावती मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधताना राळेगणसिद्धीतील आपले कार्यकर्ते चांगले काम करीत असल्याचा आनंद होत आहे. आता मी गावातील कामातून हळूहळू निवृत्त होतो, असे हजारे म्हणाले होते.

या बाबतचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. त्यावर राळेगणसिद्धीसह राज्यात व देशाभरात विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत खुलासा केला.

हजारे म्हणाले, गावातील कार्यकर्त्यांना मी नेहमी म्हणायचो, की माझा आधार आता कुठपर्यंत वापरणार? परंतु, आता कार्यकर्ते सक्षमपणे काम करीत असल्याने नक्कीच आनंद वाटतो. राळेगणसिद्धी परिवाराच्या कौटूंबिक कार्यक्रमात मी हे बोललो, ते फक्त कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी माझी जबाबदारी कमी करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी. खरे तर कार्यकर्ता कधीही गावाच्या वा सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नसतो.

निवृत्ती हा शब्द कार्यकर्त्यांसाठी बरोबर नाही. राळेगणसिद्धीच्या कामाची जबाबदारी घेण्यासाठी आता कार्यकर्ते सक्षम झालेत. ही जबाबदारी काही प्रमाणात कार्यकर्त्यांवर सोपवावी, एवढाच विचार माझा आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आमच्या राळेगणसिद्धी परिवाराचे कुटूंबप्रमुख आहेत. संत यादवबाबा सप्ताह, पद्मावती देवी नवरात्र उत्सव व गावातील सर्व विकासकामे यात तरूण कार्यकर्त्यांचा सहभाग असला तरी अण्णांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. अण्णांना आम्ही कधी निवृत्त होऊ देणार नाही अन् तेही होणार नाहीत असा विश्वास आहे.
- लाभेश औटी, माजी उपसरपंच राळेगण सिद्धी
 

समाज व देशासाठी संपुर्ण आयुष्य खर्ची घातलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीच्या कामातून निवृत्ती घेऊच शकणार नाहीत. गावातील युवक जबाबदारी घेऊन पुढे येत चांगले काम करतात. विकासकामे चांगली होतात, असे सांगत कार्यकर्त्यांना अण्णांनी शाबासकी दिली एवढेच. 
- सुरेश पठारे , उद्योजक राळेगण सिद्धी
 

loading image
go to top