शेवगावात पुन्हा हत्याकांड, माय-लेकाच्या मृत्यूचेही गूढ उकलेना

सचिन सातपुते
Wednesday, 27 January 2021

शेवगाव - नेवासे रस्त्यावरील ढोरा नदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताच्या चेहऱ्यावर जखमा आहेत.

शेवगाव : शेवगाव शहरात हत्याकांडाचा सीलसिला सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी (मायलेकाच्या) हत्याकांडाचा अद्यापि तपास लागलेला नाही. त्यातच आज पुन्हा हा मृतदेह सापडल्याने शहर व परिसरातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह आहेत.

शेवगाव - नेवासे रस्त्यावरील ढोरा नदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताच्या चेहऱ्यावर जखमा आहेत. त्यामुळे हे हत्याकांडच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव नेवासे रस्त्यावरील ढोरा नदीच्या पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात एका जणाचा मृत्यूदेह तरंगत असल्याचे काही जणांनी आज (बुधवारी) दुपारी पाहिले. त्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पो.हे. काँ. मरकड, बप्पासाहेब धाकतोडे, वैजनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा - आरक्षणामुळे वांबोरीची सत्ता मंत्री तनपुरेंकडून सत्ता हिरावली

त्यावेळी त्याच्या अंगात पूर्ण बाह्याचा शर्ट व जीन्स पँन्ट आढळून आली. त्याच्या चेह-यावर मारहाणीच्या जखमा आहेत. खिशामध्ये सापडलेल्या दोन आधार कार्डवर नाव जय राजेश वखरे (वय-२१) असे नाव आणि पत्ता आहे. मात्र, त्यावर परभणी व बीड असे दोन वेगवेगळ्या ठिकाणांचा उल्लेख आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला.

पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत संशय व्यक्त होत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another body was found in Shevgaon