जामखेडकरांसाठी पवार माय-लेकाचा आणखी धमाका, वाचा तर काय केलंय

वसंत सानप
Saturday, 12 September 2020

कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि केंद्र शासन पुरस्कृत जनशिक्षण संस्था अहमदनगर यांच्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी दिली.

जामखेड: 'आर्थिक स्थैर्य प्राप्त करायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीकडे व्यावसायिक कौशल्य असले पाहिजे यातुन अनेक व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय किंवा खाजगी सेवा देता येते. यातूनच आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. 

हा हेतू लक्षात घेऊन आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि केंद्र शासन पुरस्कृत जनशिक्षण संस्था अहमदनगर यांच्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी दिली.

यांना आहे संधी

यामध्ये जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सहकार्याने कर्जत व जामखेड तालुकात्यातील निरक्षर, बेरोजगार, अल्पशिक्षित, वंचित घटक, विधवा, परितक्त्या महिला व इतर गरजूंना कौशल्य विकास प्रशिक्षण हे नाममात्र प्रवेश फीमध्ये देण्यात येणार आहे. 

अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील लोकांना या प्रशिक्षणाचा मोफत लाभ मिळणार आहे. मतदारसंघातील लोकांना उपजिविकेचे साधन प्राप्त व्हावे या मूळ उद्देशाने कौशल्य प्रशिक्षण पुढील काळात भरवण्यात येणार आहे.

हे शिकता येईल

यामध्ये वेल्डिंग, वायरमन, घरगुती उपकरणे दुरुस्ती, भरतकाम, शिवणकाम आदी प्रशिक्षणापासून याची सुरुवात होणार आहे. नर्सरी कर्मचारी, फॅशन ज्वेलरी, अगरबत्ती मेकिंग, डेटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, पेडीक्योर आणि मनीक्युर, हेअर स्टायलिस्ट, सहाय्यक ब्युटीशियन आदी प्रशिक्षण ही या माध्यमातून देण्यात येणार आहे.

बारामतीत झाला करार

बारामती येथे झालेल्या या सामंजस्य कराराच्या वेळी सुनंदा पवार, जनशिक्षण संस्थेचे नगरचे संचालक बाळासाहेब पवार, जनशिक्षण संस्था पुण्याचे संचालक ए.एस.लगड, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे महाव्यवस्थापक संतोष देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another piece of good news from Pawar for Jamkhedkar