बोंडअळीची साखळी तोडण्यासाठी कपाशी पीक लवकर काढून टाका

राजेंद्र सावंत
Sunday, 15 November 2020

यंदा जास्त काळ पाऊस राहिल्याने कपाशीचे पीक शेतामध्ये ठेवण्याचा काळ शेतकरी वाढवू शकतात; परंतु बोंडअळीची शेतामधील साखळी तोडण्यासाठी कपाशीचा खोडवा पीक ठेवू नये.

पाथर्डी (अहमदनगर) : "यंदा जास्त काळ पाऊस राहिल्याने कपाशीचे पीक शेतामध्ये ठेवण्याचा काळ शेतकरी वाढवू शकतात; परंतु बोंडअळीची शेतामधील साखळी तोडण्यासाठी कपाशीचा खोडवा पीक ठेवू नये.

पाऊस चांगला झाल्याने हरभरा व गहू ही पिकेही घेता येतील. शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक डिसेंबरअखेरपर्यंत काढून टाकावे,'' असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी केले. 

ते म्हणाले, "कृषी विद्यापीठांच्या संशोधनानुसार या वर्षी गुलाबी बोंडअळीचा कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे काही शेतकरी कपाशीचे पीक शेतामध्ये ठेवण्याचा आग्रह धरतील. मात्र, असे करू नये. गुलाबी बोंडअळीचा नायनाट करावयाचा असल्याने कपाशी लवकर उपटावी. शेतामध्ये तुकडे करून टाकावेत, अथवा कंपोस्ट खतासाठी जमिनीत गाडावी. अळीची साखळी तोडण्यासाठी नवीन पीक हरभरा अथवा गहू घेण्याची गरज आहे. 

तालुक्‍यात कपाशीचे नुकसान झालेले आहे, तरीही रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावांत जात आहेत. शिवाय, रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून शेतकऱ्यांना माहिती देऊन कपाशीचे पीक उपटून नवीन पीक घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.'' 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal of Pathardi taluka agriculture officer regarding cotton cultivation