esakal | नगर जिल्ह्यातील गुंडेगावला आले महाबळेश्‍वरचे स्वरुप
sakal

बोलून बातमी शोधा

The appearance of Mahabaleshwar came to Gundegaon in Nagar district

नगर शहरापासून 27 किलोमीटरवरील दख्खनच्या पठारावरील डोंगरदऱ्यांत वसलेलं गुंडेगाव हे आदर्शगाव. डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याने येथील परिसराला "मिनी महाबळेश्‍वर'चे स्वरूप आले आहे. पर्यटकांसाठी हे गाव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

नगर जिल्ह्यातील गुंडेगावला आले महाबळेश्‍वरचे स्वरुप

sakal_logo
By
दत्ता इंगळे

अहमदनगर : नगर शहरापासून 27 किलोमीटरवरील दख्खनच्या पठारावरील डोंगरदऱ्यांत वसलेलं गुंडेगाव हे आदर्शगाव. डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याने येथील परिसराला "मिनी महाबळेश्‍वर'चे स्वरूप आले आहे. पर्यटकांसाठी हे गाव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. 

अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या गुंडेगाव येथे वन विभागाच्या 854 हेक्‍टरवर सात वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली. परिणामी, गावाचे रूपडे पालटल्याचे दिसते. उघडे- बोडखे डोंगर हिरवाईने नटले. त्यामुळे गाव परिसराने हिरवा शालू पांघरल्याचा भास होतो. ग्रामवन समिती, तसेच वन व्यवस्थापन समितीमार्फत 550 हेक्‍टरवर सीसीटी व 300 हेक्‍टरवर डीप सीसीटीची कामे, वन तलाव, माती बंधारे, जलसंधारणाची कामे करण्यात आली. 

वन समितीमार्फत 550 हेक्‍टरवर लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली. देशी वृक्षांच्या प्रजातीसह 55 हेक्‍टरवर हिरडा, बेहडा, हिंग, अर्जुन साताडा, तुळस अशा औषधी वनस्पतींची लागवड केली. गावातील प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा 16 किलोमीटरपर्यंत वृक्षलागवड करण्यात आली. ग्रामस्थांनी चराईबंदी, कुऱ्हाडबंदीचे काटेकोर पालन केल्याने येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष दिसतात. ऐन दुष्काळातही येथील ग्रामस्थांनी पिकांपेक्षा वृक्षसंवर्धनाकडे लक्ष दिले. परिणामी, इथला परिसर महाबळेश्वरसारखा नयनरम्य भासतो आहे. डोंगराचा माथा ते पायथा असे पाणी अडविल्याने, दरवर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला, तरी गावाच्या पाण्याची गरज भागते, असे ग्रामवन समितीचे अध्यक्ष संजय कोतकर यांनी सांगितले. यंदाच्या मुसळधार पावसामुळे सीसीटी व डीप सीसीटी, तसेच बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, लवकरच त्याची दुरुस्ती करणार असल्याचे ते म्हणाले. 

जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या संकल्पनेतून, लोकसहभागातून शिरपूर धर्तीवर साकारलेला जलसंधारणाचा गुंडेगाव पॅटर्न प्रसिद्ध झाला आहे. गावातील 11 किलोमीटरच्या शुढळा नदीवर 27 सिमेंट बंधारे व दगडी बंधाऱ्यांची उभारणी केली. जुन्यांची दुरुस्ती, 11 किलोमीटर नदीचे खोलीकरणाचे काम केले. तसेच 7 पाझरतलावांचे खोलीकरण केले. त्यामुळे पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली, असे मंगेश हराळ यांनी सांगितले. जलसंधारणाच्या कामामुळे गावात 200 हेक्‍टरवर लाखभर फळझाडांची लागवड झाली आहे. गुंडेगावला महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय संत तुकाराम आदर्श वनग्राम पुरस्कारासह अनेक पुकस्कार प्राप्त झाले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image