नगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी सोमवारपासून अर्जप्रक्रिया

अमित आवारी
Friday, 18 September 2020

महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडणुकीला विभागीय आयुक्‍तांनी नुकतीच परवानगी दिली. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

नगर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा बिगूल आता वाजला आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. 21) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. 

महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडणुकीला विभागीय आयुक्‍तांनी नुकतीच परवानगी दिली. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतदानप्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्जमाघारीची प्रक्रियाही ऑनलाइनच होणार असल्याचे नगर सचिव एस. बी. तडवी यांनी सांगितले. 

21 ते 24 सप्टेंबरदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 1.30 पर्यंत महापालिकेतील नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करता येतील. 25 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता निवडणूक विशेष सभा होणार आहे.

या सभेत सुरवातीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर अर्जमाघारीसाठी 15 मिनिटे मुदत देण्यात येईल. वैध उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. एकापेक्षा जास्त उमेदवार शिल्लक राहिल्यास ऑनलाइन मतदानप्रक्रिया होईल.अहमदनगर 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Application process for the post of Municipal Standing Committee Chairman from Monday