आता चांगलंच घडणार, बिघडणार नाही; नेवाशात आग्र्याचे आयपीएस अधिकारी

सुनील गर्जे
Tuesday, 27 October 2020

आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी पदभार स्वीकारतात पोलीस निरीक्षक डेरे यांच्यासमवेत नेवासे पोलीस ठाण्याच्या प्रत्येक विभागासह  कुकाणे पोलीस दुरक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. 
 

नेवासे :  जनतेच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर अंकूश ठेवण्याचे प्रयत्न राहील. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून तालुक्यात शांतता ठेवू. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. कोणावर ही अन्याय होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कुठलेही प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा नेवासे पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी दिला.

प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी मंगळवार (ता. २७) रोजी सायंकाळी  नेवासे  पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्याकडून पदभार स्वीकारला.  त्यावेळी त्यागी यांचे स्वागत व डेरे यांचा निरोप समारंभानिमित्त विविध राजकिय, सामाजिक संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

मुळचे आग्रा येथील अभिनव त्यागी हे संगणक अभियंता असून ते २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांचे खडतर प्रशिक्षण संपल्यावर त्यांची नेवासे पोलीस ठाण्यात पहिलीच प्रशिक्षणार्थी म्हणून तीन महिन्यांसाठी प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तर नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. डेरे यांच्या काळात विधानसभा, अनेक ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडल्या. नेवासे पोलीस ठाण्याला  प्रथमच आयपीएस अधिकारी मिळाल्याने सर्वसामान्यांना दिलासा तर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. 

पहिल्याच दिवशी कामकाज सुरू

आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांनी पदभार स्वीकारतात पोलीस निरीक्षक डेरे यांच्यासमवेत नेवासे पोलीस ठाण्याच्या प्रत्येक विभागासह  कुकाणे पोलीस दुरक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. 
 

"पोलीस दलात काम करतांना खाकी हाच धर्म असतो.  हा धर्म मी पहिल्यापासून जोपासला.  कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी पार पाडता आली. हे करीत असतांना तालुक्यातील जनतेने पोलीस प्रशासनाला दिलेले प्रेम माझ्या कायम स्मरणात राहील. 
- रणजित डेरे, मावळते पोलीस निरीक्षक, नेवासे, अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of IPS officer of Agra in Nevasa