पारनेर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून लागणार अधिकाऱ्यांची वर्णी

मार्तंड बुचुडे
Saturday, 8 August 2020

पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीची मुदती सप्टेंबर अखेर संपत असून त्या ग्रामपंचयतीवर मुदत संपण्याच्या तारखेला प्रशासकाची नेमणुक होणार आहे.

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीची मुदती सप्टेंबर अखेर संपत असून त्या ग्रामपंचयतीवर मुदत संपण्याच्या तारखेला प्रशासकाची नेमणुक होणार आहे. मात्र त्या जागेवर प्रशासक सरकारी अधिकारी की ग्रामस्थ हाच खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सध्या हा प्रशन न्यायालयात असल्याने किमान या महिना अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीवर मात्र सरकारी अधिकाऱ्यांचीच वर्णी लागणार आहे.
पारनेर तालुक्यात 113 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी अतीशय मोठ्या संखेने ग्रामपंचायतींच्या मुदती सप्टेंबरअखेर संपत असल्याने त्या ठिकाणी प्रशासकांच्या नेमणुका होणार आहेत. तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या मुदती सप्टेंबरअखेर संपत आहेत.

राज्य निवडणुक आयोग व न्यायालयानेही सध्याच्या सरपंचांना मुदत वाढ देण्यास नकार दिल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. मात्र त्यातच प्रशासक कोण नेमावा हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या दरम्यान सरकारने एक अध्यादेश काढून पालक मंत्र्यांच्या सल्याने मुख्यकार्यकारी आधिकारी यांच्या सहीने प्रशासक नेमावा असा आदेश राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आला होता. त्यावर वेगवेगळ्या स्तरावरून टिकाही झाली होती. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते न्यायालयातही गेले आहेत. या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजीही व्यक्त केली होती इतकेच नव्हे तर त्यासाठी मला कदाचित शेवटचे आंदोलन कारवे लागेल असा इशाराही दिला होता. 

प्रशासक नेमण्याबाबतचा प्रश्नाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू असल्याने पुर्वीच्या नियमानुसार व या महिना अखेरीस तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या मुदती संपत असल्याने व तो पर्यंत न्यायालयाचा निकाल लागण्याची शक्यता नसल्याने तेथे किमान सरकारी अधिकारी यांचीच नेमणुक करावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. 

तालुक्यातील 88 पैकी डिस्कळ, पोखरी, सारोळा आडवाई ,वारणवाडी, कर्जुले हर्या, कासारे, देसवडे व म्हसोबा झाप या आठ ग्रामपंचातीची मुदत 24 ते 28 ऑगस्ट अखेर संपत आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतीच्या मुदती सप्टेंबर अखेर संपत आहेत. त्यामुळे या महिणा अखेर मुदत संपणा-या आठ ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी सरकारी अधिका-यांचीच नेमणुक होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्या मुळे ग्रामस्थांचे तसेच तालुक्यातील राजकिय कार्यकर्त्यांचे याकडे लक्ष लागले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of officers as administrators in 88 grampanchayats of Parner taluka

टॉपिकस