पालेभाज्याची आवक वाढली, लिलावात असे आहेत दर...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

आठ दिवसांपासुन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात पालेभाज्याची आवक वाढली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : आठ दिवसांपासुन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात पालेभाज्याची आवक वाढली आहे. तालुक्यातील निमगावखैरी, गोंडेगाव, पढेगाव, माळडगाव, बेलापूर परिसरासह पुणे जिल्ह्यातील खेड मंचर, आळेफाटा येथुन पालेभाज्याची आवक येत आहे. 

पावसाळा सुरु होताच पालेभाज्याची आवक वाढत असली तरी लिलावातील दर स्थिर आहे. परंतू किरकोळ विक्री मात्र तेजीत सुरु आहेत. येथील भाजीपाला बाजारात मेथी दिड हजार जुडी, कोंथीबिर 400 जुडी, शेपु एक हजार, पालक 500 जुड्याची आवक झाली होती. 

सर्व पालेभाज्यांना पाच ते सात रुपये प्रति जुडी असा सरासरी दर मिळाला. तर कोंबी, प्लॉवर, वांगी, भेंडी अशा विविध भाजीपाल्यासह भुईमुग शेंगाची सरासरी आवक झाली होती. मुठेवाडगावसह बेलापूर परिसरातुन बाजारात टॉमेटोची आवक येत असल्याची माहिती बाजार समितीचे कर्मचारी वामन मोरगे यांनी दिली. काही दिवसात टॉमेटोच्या दरात सुधारणा झाली असल्याने टॉमेटोच्या प्रति क्ररेटसाठी 300 ते 400 रुपये दर मिळत आहे. टॉमेटची आवक मात्र सध्या मंदावली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आठवडे बाजारासह शहरातील मुख्य भाजीपाला मंडी बंद आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेते पहाटे लिलावात कमी दरात भाजीपाला खरेदी करुन शहरासह ग्रामीण भागातील रस्त्याच्याकडेला बसुन भाजीपाल्याची विक्री करतात. लिलावावेळी आडतदारांना दलाली द्यावी लागत असल्याने किरकोळ खरेदीदार शेतकर्यांकडुन कमी दरात भाजीपाल्याची खरेदी करतात. 

किरकोळ विक्रीसाठी वाहतुक खर्च तसेच दलाली लागत असल्याने खरेदीच्या दुप्पट दराने ग्राहकांना भाजीपाल्याची विक्री करतात. परिणामी शेतकर्यांसह ग्राहकांना त्याचा फटका बसतो. तर मध्यस्त असलेले किरकोळ विक्रेते पैसे कमावतात. शहरासह तालुक्यात 500 हुन अधिक किरकोळ भाजीपाला विक्रेते आहे. त्याच्यामार्फत ग्राहकांना भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. दरवर्षी पावसाळ्यात पालेभाज्याची आवक वाढते. ठोक बाजारात पालेभाज्याचे दर स्थिर असतात. परंतू किरकोळ बाजारात भाजीपाला महाग झाल्याची ओरड असते. ती यंदाही दिसुन येत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrival of leafy vegetables increased in the Agricultural Produce Market Committee at Shrirampur