आशालता यांची भंडारदऱ्याला येण्याची इच्छा राहिली अधुरीच

शांताराम काळे
Tuesday, 22 September 2020

मुंबई-घोटीमार्गे त्या अकोले येथे आल्या होत्या. विश्रामगृहावर त्यांचा पत्रकारांनी सत्कार केला. त्यावेळी जयश्री गडकर यांच्यासोबतच्या आठवणी, अनुभव त्यांनी पत्रकरांसोबत शेअर केले. 

अकोले : जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर अतिशय मृदू व हळव्या स्वभावाच्या होत्या. परंतु त्या तितक्याच स्पष्टवक्त्याही होत्या. आशाताई संगमनेर येथे काही दिवसांपूर्वी रंगकर्मी संगमनेर संस्थेने आयोजित केलेल्या त्यांच्यासह अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

मुंबई-घोटीमार्गे त्या अकोले येथे आल्या होत्या. विश्रामगृहावर त्यांचा पत्रकारांनी सत्कार केला. त्यावेळी जयश्री गडकर यांच्यासोबतच्या आठवणी, अनुभव त्यांनी पत्रकरांसोबत शेअर केले. 

संस्थेचे अध्यक्ष अंतून घोडके, वकील अनिल आरोटे, सकाळचे प्रतिनिधी शांताराम काळे, विजय पोखरकर यांच्यासोबत मनमुराद गप्पा मारताना त्यांनी भंडारदरा येथे मी तीन चित्रपटाची शूटिंगसाठी आले होते. सुंदर निसर्ग आहे. मला भंडारदार येथे निसर्गरम्य वातावरणात काही क्षण घालवायचे आहेत. अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती.

पुढील वर्षी पावसाळ्यात नक्की भंडारदरा निसर्ग परिसराला आपण भेटू देऊ, असे ठरवलेदेखील होते. परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन बंद असल्यामुळे हे शक्य होऊ शकले नाही. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. याची येथील सर्वांनाच हुरहुर कायम राहील. 

रंगकर्मी संस्थेचे अध्यक्ष अंतून घोडके ही खंत व्यक्त केली. अकोले पत्रकार संघ, राजूर प्रेस क्लबच्या वतीने आशालता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashalta's desire to come to Bhandardarya remained unfulfilled