esakal | मंत्री भुजबळांचे आमदार आशुतोष काळेंना बळ, दिला चौथ्या आवर्तनाचा अधिकार
sakal

बोलून बातमी शोधा

Ashutosh Kale got the right to the fourth water cycle ahmednagar news

आमदार आशुतोष काळे यांना गोदावरी कालव्यातून द्यायच्या चौथ्या आवर्तनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.​

मंत्री भुजबळांचे आमदार आशुतोष काळेंना बळ, दिला चौथ्या आवर्तनाचा अधिकार

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता ः महाविकास आघाडीचे सरकार चालविताना, स्वपक्षीय आमदाराला बळ देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना गोदावरी कालव्यातून द्यायच्या चौथ्या आवर्तनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. त्यापूर्वी कालवे पाणी वाटप सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घेण्याची त्यांची मागणीही मान्य करण्यात आली.

आता चौथ्या आवर्तनासाठी पहिल्या तीन आर्वतनात पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आव्हान जलसंपदा अधिका-यांना स्वीकारावे लागेल. 

सुदैवाने येथील सिंचन व्यवस्थेचा अनुभव असलेले कार्यकारी अभियंता सागर शिंदे येथे रूजू झाले आहेत. यंदा सिंचनासाठी अडीच टीएमसी पाणी कमी आहे. जलद कालवा आणि गोदावरी कालवा यांचे आवर्तन एकाचवेळी करणे शक्य झाले तर साडे चार टिएमसी पाण्याच्या बिगर सिंचन आरक्षणात हा जलद कालवा सहभागी होईल. त्यातून किमान दोन टिएमसी पाणी वाचू शकेल. बाष्पीभवनाची घट दोन टीएमसी गृहित धरली. त्यातून एक टीएमसी पाणी जादा मिळू शकेल. त्यातून चौथे आवर्तन शक्य आहे. 

कालव्यांच्या दोन्ही बाजूला वाढलेली काटेरी झुडूपे व गवतात हरविलेल्या वितरीका दुरूस्त करण्यासाठी 80 लाख रूपयांची तरतुद करण्यात आली. ही रक्कम खरोखरीच ठरवून दिलेल्या कामावर खर्ची पडली तर कालवे व वितरीका स्वच्छ होतील.

पाण्याचा मोठा अपव्यय टळेल. मात्र, कागदोपत्री खर्ची टाकण्याची पध्दत यावर्षीही सुरू राहिली तर पाण्याचा अपव्यय होईल. कालवा व वितरीकांच्या दूरूस्तीच्या कामाच्या दर्जाकडे लाभक्षेत्रातील आमदारांनी गांभीर्याने पहायला हवे. 

यंदा रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन तिस दिवसात संपले तर फार बरे होईल. ते येत्या 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यत संपले तर पुढे उन्हाळी हंगामातील आवर्तने प्रत्येकी वीस दिवसांची होतील. एक मार्च, दहा एप्रिल व वीस मे अशा त्यांच्या तारखा ठरवता येतील. तसे झाले तरच लाभक्षेत्रातील बारमाही पिके व्यवस्थीत रहातील. 

यंदा अडिच टिएमसी पाण्याची तुट असल्याने गोदावरी कालव्यांतून तिन आवर्तनांचे नियोजन केले आहे. मात्र रब्बीत पाणी वापर मर्यादित झाला. उन्हाळी हंगामात परिस्थीती नियंत्रणात राहीली तर उर्वरीत पाण्यातून चौथे आवर्तन करता येईल का हे पहाता येईल. वितरिकांची दुरूस्ती आवर्तनापूर्वी केली जाईल.

- सागर शिंदे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा नाशिक विभाग. 

चौथ्या आवर्तनासाठी पाण्याची बचत, जलद कालव्या सोबत संयुक्त आवर्तन आणि बाष्पीभवन तुटीतून शिल्लक पाणी याबाबींकडे लक्ष द्यावे लागेल. 
-उत्तमराव निर्मळ (निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग)

संपादन - अशोक निंबाळकर

loading image