esakal | नदीत कपडे धुताना पडलेली टोकरी काढण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwini Sampat Pawar from Chikhalthan drowned in Godavari river

चिखलठाण येथे मंगळवारी दुपारी एक वाजता मुळा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नदीत कपडे धुताना पडलेली टोकरी काढण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : चिखलठाण येथे मंगळवारी दुपारी एक वाजता मुळा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन तासानंतर नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

आश्विनी संपत पवार (वय ११, रा. चिखलठाण) असे मृत मुलीचे नाव आहे. म्हसवंडी (ता. संगमनेर) येथे शासकीय मुलींच्या आदिवासी आश्रम शाळेत सहावीमध्ये ती शिक्षण घेत होती. कोरोनामुळे शाळांना सुट्टी असल्याने सध्या ती घरी होती. तिचे आई- वडील वीटभट्टीवर मोलमजुरी करतात. दुपारी एक वाजता चिखलठाण येथे मुळा नदीवर घरातील कपडे धुण्यासाठी अश्विनी गेली होती. तिची लहान चुलत बहीण तिच्याबरोबर होती.  

मुळा धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी असल्याने, नदीपात्रात तीस फुटापर्यंत पाणी होते. धुण्याच्या कपड्यांची प्लास्टिकची टोकरी (घमेली) पाण्यात वाहत चालली. टोकरी पकडण्यासाठी अश्विनीने पाण्यात उडी मारली. अश्विनीला पोहता येत होते. त्यामुळे, तिने धाडस केले. परंतु, अथांग पाण्यात टोकरी लांब पर्यंत वाहत गेली. त्यामुळे, पाण्यात तिची दमछाक झाली. अश्विनी बुडाली. नदीकाठावरील तिच्या लहान चुलत बहिणीने घाबरून, आरडाओरड करीत घर गाठले. अश्विनीचे आजोबा तातडीने घटनास्थळी धावले.

सरपंच डॉ. सुभाष काकडे व ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. म्हैसगाव येथील पोहण्यात तरबेज असलेल्या संदीप माळी, नवनाथ वाघ यांनी दोन तास नदीपात्रात शोधकार्य करून, मृतदेह बाहेर काढला. मृत अश्विनीच्या मागे आजोबा, आई- वडील, सहा बहिणी व एक लहान भाऊ असा परिवार आहे. म्हसवंडी येथील शासकीय आश्रम शाळेच्या शिक्षकांनी आज (बुधवारी) अश्विनीच्या कुटुंबाला भेट देऊन, आर्थिक मदत व किराणा सामान पोहोचविले. आदिवासी समाजाच्या अत्यंत गरीब कुटुंबावर ओढवलेल्या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन : अशोक मुरुमकर