आरोपी आहे मुंबईचा पोलिस अधिकारी; श्रीगोंद्याचे पोलिस म्हणतायेत सापडेना

संजय आ. काटे
Monday, 3 August 2020

पत्नीला आत्महत्येस भाग पाडल्याच्या गुन्ह्यातील पोलिस अधिकारी असलेला संशयित आरोपी पती 17 दिवस उलटूनही नगरच्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

श्रीगोंदे (अहमनदनगर) : पत्नीला आत्महत्येस भाग पाडल्याच्या गुन्ह्यातील पोलिस अधिकारी असलेला संशयित आरोपी पती 17 दिवस उलटूनही नगरच्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही. वाशी (मुंबई) येथे तो सहायक पोलिस निरीक्षक आहे.

त्याच्याशिवाय घरातील चौघांना सुरवातीला आरोपी केले होते. त्याचा संबंध असण्याच्या संशयावरून महिला कर्मचाऱ्यासही आरोपी केले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी नगरची तीन पथके तैनात केली असली, तरी पोलिसांच्या तपासाची पद्धत माहिती असल्याने आरोपी अजून हाती लागलेले नाहीत. 

तालुक्‍यातील थिटे सांगवी येथील अमिता देवकाते या विवाहितेने 14 जुलै रोजी घरी आत्महत्या केली. याबाबत तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. मृत अमिताचा पती पांडुरंग देवकाते हा वाशी येथे सहायक पोलिस निरीक्षक असून, तेथे त्याचे एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत "अफेअर' असल्याने अमिताने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

सुरवातीला या गुन्ह्यात पती पांडुरंग याच्यासह त्याचे आई-वडील व भावास आरोपी केले होते. आरोपींच्या शोधासाठी श्रीगोंदे पोलिस, कर्जतचे उपअधीक्षक व गुन्हे अन्वेषणचे पथक नेमले. या पथकांनी आरोपी व विशेषत: पोलिस अधिकाऱ्याच्या शोधासाठी जंग जंग पछाडले. मात्र, अजून पोलिस त्यास पकडू शकलेले नाहीत. पोलिसांनी माहितीच्या आधारे नंतर संबंधित महिला पोलिसालाही आरोपी केले. मात्र, अजूनही कुठलाच आरोपी हाती लागलेला नाही. 

पोलिस पथकांनी मुंबई, पुणे, ठाणे, वाशी, नगर, सोलापूर आदी ठिकाणी फेऱ्या मारल्या; मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आरोपींसह त्यांच्या संपर्कातील 50पेक्षा जास्त मोबाईलचे लोकेशन व डाटा पोलिसांनी तपासला. मात्र, आरोपी कुठे आहे, याचा शोध लागत नसल्याचे समजले. एका मोबाईलवरून या पोलिस अधिकाऱ्याने पुण्यात फोन केल्याची माहिती समजल्यावर पोलिस आता त्या व्यक्तीच्या तपासात गुंतले आहेत. 

नगरच्या पोलिसांची तपासाची पद्धत मुख्य आरोपीला माहिती आहे. त्यामुळे आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवल्याचे समजते. नवीन सिमकार्ड समजेपर्यंत तेही बंद झालेले असते. त्यामुळे आरोपींनी तिन्ही पथकांच्या नाकीनऊ आणल्याचे दिसते. 

गुन्ह्याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपी अटक करण्यात अजून यश आले नसले, तरी गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून, लवकरच आरोपीही अटक होतील. 
- सतीश गावित, तपासी पोलिस अधिकारी, श्रीगोंदे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Inspector of Police in Mumbai a FIR with Shrigonda Police