दुचाकीवर बियाणे खरेदीसाठी गेलेल्या सहाय्यक फौजदारांचा मृत्यू; चुलत भाऊ गंभीर जखमी

विलास कुलकर्णी
Wednesday, 26 August 2020

राहुरी येथे बुधवारी (ता. २६) दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपासमोर नगर- मनमाड महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी येथे बुधवारी (ता. २६) दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपासमोर नगर- मनमाड महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील सहाय्यक फौजदार जागीच ठार झाले आहेत.

त्यांचे चुलत बंधू गंभीर जखमी झाले. वसंत दत्तात्रेय टकले (वय 56, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा) असे मृताचे नाव आहे. ते सहाय्यक फौजदार पदावर राज्य राखीव दलाच्या ग्रुप नं. पाच मध्ये दौंड येथे कार्यरत होते. त्यांचे चुलत बंधू भाऊसाहेब सोन्याबापु टकले गंभीर जखमी झाले. 

कृषी विद्यापीठ येथे बियाणे खरेदीसाठी टकले बंधू दुचाकीवर चालले होते. कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपासमोर नगर- मनमाड महामार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या पिकअप या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. त्यात, सहाय्यक फौजदार वसंत टकले जागीच ठार झाले. गंभीर जखमी भाऊसाहेब टकले यांना राहुरी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant police inspector killed in accident Rahuri Agricultural University