एटीएममध्ये तुमच्याबाबत असं होत असेल तर, सावधान!

सुनील गर्जे
Sunday, 27 September 2020

दरम्यान पोलिसांनी  त्याच्याकडुन विविध बँकांचे एकूण नऊ एटीएम कार्ड व एक दुचाकी जप्त असा ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेवासे  : तुमच्याकडे असलेल्या एटीएमचा पीन सांगा, मी बँकेतून बोलतोय, असे फोन वारंवार येत असतात. त्यातून फसवणूक होतेच. परंतु एटीएममध्ये गेल्यावर आपल्या डोळ्यादेखत लूट होऊ शकतो.

 'एटीएम' मध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मदतीचा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून नंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यावरून पैसे काढणाऱ्या ' भामट्यास' नेवासे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सापळा रचून जेरबंद केले.      

दरम्यान पोलिसांनी  त्याच्याकडुन विविध बँकांचे एकूण नऊ एटीएम कार्ड व एक दुचाकी जप्त असा ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सनिदेवल विष्णू चव्हाण ( वय २१, राहणार मुद्येश वडगांव ता.गंगापूर, जि. औरंगाबाद ) असे पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. याबाबत माहीती अशी,  पुंडलिक जालिंदर लष्करे (रा. पावन गणपती जवळ, नेवासे खुर्द) हे  नेवासे फाटा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएमजवळ  सनिदेवल चव्हाण हा तेथे आला व पैसे काढण्यासाठी मदत करतो म्हणून एटीएम कार्डची अदलाबदल करून  (ता. ८ व ९ ) सप्टेंबर रोजी अनुक्रमे २० व ६ हजार ५०० असे  २६ हजार पाचशे रुपये काढून घेतले.

हा प्रकार लष्करे यांच्या मोबाईलवर आलेल्या बँकेच्या मेसेज वरून उघड झाला. त्यानंतर पुंडलिक लष्करे यांनी नेवासे पोलिसांत शनिवार (ता. २६) रोजी याप्रकरणी  फिर्यादी दिली.  या फिर्यादीवरून पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल रवी पवार यांनी शनिवारी सायंकाळी नेवासे  फाटा येथील  'एटीएम' परिसरात सापळा रचून  सनिदेवल चव्हाण यास पकडले.

दरम्यान पकडल्यावर त्याने  पोलीसांबरोबर  झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांनाच  रस्त्याने जात असलेले  सैन्य दलातील लष्करी जवान  ज्ञानदेव बर्डे यांच्यासह नागरिकांनी पोलिसांना मदत करून त्याला पकडले.

आरोपीकडून  नऊ 'एटीएम' कार्ड जप्त 

आरोपी सनीदेवल चव्हाण याला जेरबंद केल्यावर पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे  महाराष्ट्र बँकेचे एक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे चार, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे दोन, बंधन बँकेचे एक, अॅक्सीस बँकेचे एक असे एकूण नऊ  एटीएम कार्ड  व  एक पल्सर दुचाकी ( एम.एच २१ बी.बी.४०६७) हा मुद्देमाल सापडला.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATMs can be robbed in this way