नगर जिल्हा पुन्हा हदरला; बलात्काराची केस मागे घे म्हणत जाळण्याचा प्रयत्न

मार्तंड बुचडे
Saturday, 15 August 2020

बलात्काराची केस मागे घे असा दम देत एका २६ वर्षाच्या तरूणीच्या छोट्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल फेकले व दुसऱ्याने पेटती काडी फेकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

पारनेर (अहमदनगर) : बलात्काराची केस मागे घे असा दम देत एका २६ वर्षाच्या तरूणीच्या छोट्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल फेकले व दुसऱ्याने पेटती काडी फेकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना दोन दिवसांपुर्वी गुरूवारी (ता. 13 ) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास वाघुंडे शिवारात घडली आहे. या बाबत दोघांच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा. पळवे खु) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व तिची छोटी मुलगी गुरूवारी सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास त्यांच्या वाघुंडे शिवारात असलेल्या कोपीत जेवन करीत होत्या. त्याचवेळी संशयित आरोपी दुचाकीवरूऩ फिर्यादीच्या कोपीजवळ आले. त्यांनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांनी तू आमच्यावर जी बलात्काराची केस दिली आहे, ती मागे घे असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादीची 10 वर्षाची मुलगी बाहेर आली. त्यावेळी यातील राजाराम तरटे याने त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल फेकले.

आरोपी अमोल तरटे याने तिच्या दिशेने पेटती काडी फेकली. त्यात फिर्यादीची छोट्या मुलीची फ्रॉक पेटली. त्यात ती मुलगी भाजून गंभीर जखमी झाली. हे दोघेही आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशानेच आमच्या येथे आले होते, असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत दोघांविरोधात सुपे पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 14 ) रात्री 11 वाजणेच्या सुमारास जीवे मारण्याचा व अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधिक्षक अजित पाटील करत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to set fire to mother and daughter in Parner taluka