जावयाने धोंड्याऐवजी खाल्ले सासरघरचे दांडे

सुनील गर्जे
Sunday, 27 September 2020

पोलीस शिपाई सतीश देसाई यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून गणपत पवार यांच्या विरोधात नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. 

नेवासे : धोंड्याचा महिना जावयासाठी पर्वणी, तर सासरच्या मंडळीची कसोटी पाहणारा असतो. अनेकदा भेटवस्तुच्या देण्याघेण्यावरुन वादही समोर येतात. मात्र गोगलगाव (ता. नेवासे) येथे आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला 'धोंड्या' ऐवजी 'दांडे' खाण्याची वेळ आली.

असा पाहुणचार झाल्याने वैतागलेल्या जावयाने थेट नेवासे पोलीस ठाणे गाठले. आणि तेथेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (ता. २७) रोजी घडली. 

तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.  पण, या कृत्यामुळे सासुरवाडीऐवजी 'पोलीस कोठडी'त मुक्काम करण्याची वेळ त्याच्यावर आली. 

गणपत दगडू पवार (वय ३५, राहणार शिर्डी, ता. राहाता ) असे आत्महत्या  करण्याचा प्रयत्न करणाऱ्या  'जावई बापू'चे नाव आहे. या बाबत माहिती अशी, गणपत पवार याने शनिवारी (ता. २६) रोजी त्याच्या पत्नीला तिच्या माहेरी (रा. गोगलगाव, ता. नेवासे) सोडले आणि दुसऱ्याच दिवशी रविवारी (ता. २७) रोजी तिला बरोबर घेऊन जाण्यासाठी पुन्हा सासरवाडीला आला. मात्र, सासरच्या मंडळीने मुलीला त्याच्याबरोबर पाठवण्यास नकार दिला.  
संतापलेल्या पवारने रागाचे भरात रविवारी त्याच्या दुचाकीवर  (एम.एच १७ बी.डब्यु ०११४) नेवासे पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटसमोर आला. त्याने दुचाकी स्टँडला लावून अचानक डिक्कीतून  पेट्रोलची बाटली काढून अंगावर ओतून घेतली. हा प्रकार वायरलेस कर्तव्यास असलेले पोलीस शिपाई सतीश देसाई यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ त्याच्या हातातील पेट्रोल बाटली हिसकावून त्याला ताब्यात घेतली. यावेळी पवार याने सासरची मंडळी माझ्या पत्नीला माझ्याबरोबर पाठवत नाही म्हणून आपण असे कृत्य केल्याचा जबाब दिला आहे. 

पोलीस शिपाई सतीश देसाई यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून गणपत पवार यांच्या विरोधात नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. 

 

"घरगुती वादातून झालेला हा प्रकार असून संबंधित व्यक्तीने अंगावर पेट्रोल टाकून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 
- रणजित डेरे, पोलीस निरीक्षक, नेवासे

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted suicide in Nevasa