esakal | नेत्यांना आले पुन्हा अच्छे दिन; हाती माईक आला अन्‌ मास्कही झाले गायब
sakal

बोलून बातमी शोधा

Attendance of wedding of leaders of political parties in Shrigonda taluka

कोरोना संकटात अनेक महिने घरात बसलेले तालुक्यातील नेते आता विवाहासह इतर कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आहेत.

नेत्यांना आले पुन्हा अच्छे दिन; हाती माईक आला अन्‌ मास्कही झाले गायब

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : कोरोना संकटात अनेक महिने घरात बसलेले तालुक्यातील नेते आता विवाहासह इतर कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या हाती अशा कार्यक्रमात माईकही येवू लागला असून चेहऱ्याला मास्क न लावता बिनधास्त फोटोशेसनही सुरु झाल्याने श्रीगोंद्यातील कोरोना अशा नेत्यांना पाहून पळून तर गेला नाही अशी शंका येत आहे.

तालुक्यात कोरोनाने कहरच केला आहे. सुरुवातीचे अनेक महिने कोरोनाला रोखण्यात सर्वांनाच यश आले होते. त्यामुळे अनेकजण कोरोनायोध्देही झाले. अनेकांच्या हाती कोरोनायोध्दे असल्याचे प्रशस्तिपत्रके दिसत होती. मात्र कोरोनाची संख्या वाढू लागली आणि हे कोरोनायोध्दे गायब झाले.

आजच्या माहितीनूसार तालुक्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 795 आहे. त्यातील 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 24 जणांवर उपचार सुरु असला तरी गेल्या तीन दिवसात सुमारे शंभर जणांच्या घशाचा स्त्राव घेतला असून रॅपिड तपासणी कीट संपल्याने हे सगळे स्त्राव नगरला तपासणीसाठी पाठवले असून अद्यापपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण समजत नाहीत.

दरम्यान कोरोना लाॅकडाऊन काळात घरात बसलेले तालुक्यातील नेते आता बाहेर पडले आहेत. बहुतेक नेत्यांनी विवाहसोबतच इतर सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लागत आहे. त्यातच आता उपस्थितांची संख्या वाढत असून पन्नास लोकांचा विवाह हा कागदावर आहे.

मंगलकार्यालये गच्च भरत असून आलेल्या नेत्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची रेलचेल वाढली आहे. आलेल्या नेत्यांच्या हाती शुभाशिर्वादासाठी माईक येत असल्याने त्यांच्यात उत्साह संचारला आहे. अनेक नेत्यांनी मास्कलाही आता बाय बाय केला असून अनेकांच्या गराड्यात घेतलेल्या फोटोशेसन सोशल मिडीयात टाकताना कुणालाही कमीपणा वाटत नाही अथवा कोरोनाची धास्ती राहिली नाही.

संपादन : अशोक मुरुमकर