अतिरिक्त पोलिस अधिक्षकांच्या व्हायरल क्‍लिप, डिझेल प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड व नेवासे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या संभाषणाची व्हायरल क्‍लिप आणि डिझेल प्रकरणाचा लवकर सोक्षमोक्ष लावावा.

अहमदनगर : अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड व नेवासे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या संभाषणाची व्हायरल क्‍लिप आणि डिझेल प्रकरणाचा लवकर सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. श्‍याम असावा यांनी गृहमंत्रालयाकडे केली आहे.

निवेदनात ॲड. असावा यांनी म्हटले आहे, की कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली; परंतु अधिकारी असलेल्या राठोड यांच्यावर फक्त बदलीची कारवाई करण्यात आली. खरे तर त्यांनाही निलंबित करूनच व्हायरल क्‍लिप व डिझेल प्रकरणाचा सोक्षमोक्ष लवकर लागणे व पोलिस खात्यातील आर्थिक हितसंबंध मोडीत काढणे आवश्‍यक आहे.

व्हायरल क्‍लिप वरिष्ठांनी ऐकली नाही, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा हात झटकण्याचा प्रकार आहे. अवैध व्यावसायिकांवर कारवाया करून धाक निर्माण करायचा, जेणे करून तो घाबरून अधिकारी मागेल तितका हप्ता देण्यास तयार होतो. ही कार्यपद्धती नवी नाही.

गुन्हेगारांशी आर्थिक तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली ही कारवाई होऊच शकत नाही. त्यांना तातडीने निलंबित करून लवकर तपास करावा. गर्जे व राठोड यांचे कॉल डिटेल्स व आवाजाचे नमुने समोर आणले पाहिजेत, असे निवेदनात म्हटले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Audio Clip of Additional Superintendent of Police and staff of Nevasa Police Station in Nagar district goes viral