esakal | खळबळजनक ः त्या मुलीचे मृ्त्यूप्रकरण "नाजूक" वळणावर, आत्येभाऊच निघाला मारेकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Aunty's son had killed Vaishnavi

घटना झाल्यापासून पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेत महत्त्वाचा संशयित म्हणून वैष्णवीच्या आई-वडील व बहिणीसह भाचा, म्हणजे वैष्णवीचा आत्येभाऊ आप्पासाहेब याला ताब्यात घेतले होते.

खळबळजनक ः त्या मुलीचे मृ्त्यूप्रकरण "नाजूक" वळणावर, आत्येभाऊच निघाला मारेकरी

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : तालुक्‍यातील सौंदाळे येथील वैष्णवी आरगडे (वय 9) हिच्या संशयास्पद मृत्यूचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलीचे आई-वडील साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगत होते. परंतु आता त्याला नाजूक वळण मिळाले आहे.

बाहेरील व्यक्ती वैष्णवीचा मारेकरी नाही तर तिचा आत्येभाऊच तिचा खुनी असल्याचे स्पष्ट झाले. आप्पासाहेब नानासाहेब थोरात (वय 25, मूळ रा. आपेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद), असे त्याचे नाव आहे. त्याने तशी कबुलीही त्याने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सरकारी मदतीच्या लालसेतून फुटले बिंग

वैष्णवीचा तिच्या राहत्या घरी झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याचे काल (रविवारी) सकाळी उघड झाले. मात्र, आई-वडिलांनी तिचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा कांगावा करत अंत्यविधी उरकण्याची तयारी केली. मात्र, मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने शासकीय योजनेतून एक लाख रुपये मिळतील म्हणून मुलीची उत्तरीय तपासणी करावी, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. एक लाखाच्या लालसेने आई-बापाने उत्तरीय तपासणीला होकार दिला. आणि त्यातूनच संशयित मृत्यू प्रकरणाला कलाटणी मिळाली.

डॉक्टरांना आला संशय

नेवासे फाटा येथे ग्रामीण रुग्णालयात मुलीचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे वैष्णवीच्या चुलत्याने सांगितले. प्राथमिक तपासणीत संशय आल्याने डॉक्‍टरांनी पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक रणजित डेरे, उपनिरीक्षक भरत दाते यांनी रुग्णालयात जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलखोल होईल, या भीतीने उत्तरीय तपासणीला मुलीचे आई, वडील व चुलत्याने विरोध केला होता.

एसपी गेले घटनास्थळी

दरम्यान, पोलिसांनी वैष्णवीचे आई, वडील, मोठी बहीण, चुलते व त्यांच्याकडे शिक्षणासाठी असलेला भाचा आप्पासाहेब यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनीही सौंदाळे येथे जाऊन माहिती घेतली. नंतर कुकाणे येथे येऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयितांची चौकशी केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती आली नाही.

यादरम्यान पोलिस अधीक्षकांनी सर्पदंशाने मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळला. पोलिसांनी आज दुपारपर्यंत सर्व संशयितांची चौकशी केली व आप्पासाहेबला आणखी चौकशीसाठी ताब्यात ठेवून इतरांना सोडून दिले. पोलिसी खाक्‍या दाखवूनही त्याने तोड उघडले नाही.

दरम्यान, नेवासे पोलिसांत आज दुपारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, सायंकाळी जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आप्पासाहेबला ताब्यात घेतले. आणि काही वेळातच त्याने खुनाची कबुली दिली. त्याने नाजूक कारणातून हा खून केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

तोच होता पोलिसांच्या रडारवर 
घटना झाल्यापासून पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेत महत्त्वाचा संशयित म्हणून वैष्णवीच्या आई-वडील व बहिणीसह भाचा, म्हणजे वैष्णवीचा आत्येभाऊ आप्पासाहेब याला ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्‍या दाखवूनही तो सराईतांसारखा या प्रकरणी चुप्पी धरून होता. तोच या प्रकरणातील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीचा शोध लावण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, निरीक्षक रणजित डेरे आदींनी विशेष प्रयत्न केले. 

या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाला आहे. मात्र, आणखी पुरावे व इतर माहिती हाती लागायचे आहेत. आरोपी आप्पासाहेब पोलिसांच्या ताब्यात असून, त्याबाबत माहिती मंगळवारी देण्यात येईल. 
- मंदार जवळे, पोलिस उपअधीक्षक, शेवगाव