Aurangabad : निखळ आनंदासाठी श्वानांवर हजारोंचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dog

Aurangabad : निखळ आनंदासाठी श्वानांवर हजारोंचा खर्च

औरंगाबाद : श्वान म्हणजे निखळ आनंद देणारा, रक्षण करणारा, प्रामाणिक आणि जीव लावणारा प्राणी आहे. रक्षण करण्याचा प्रमुख धर्म असलेले श्वान लळा लागल्यानंतर श्वानप्रेमी त्यांच्यावर हजारो रुपये खर्च करीत असल्याचे निदर्शनास आले असून घरांमध्ये श्वान ठेवणे प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्याने दिवसेंदिवस विविध देशी, विदेशी जातींचे श्वान बाळगणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे रोटरी क्लबने भरवलेल्या श्वान प्रदर्शनात दिसून आले.

या श्वान प्रदर्शनात शिकार मिळेपर्यंत पाठलागाने चित्तास्टाइल धावणारा पश्मी मुधोळ हाऊंड, रक्षणासाठी चोवीस तास तत्पर असलेला केन कॉरसो, नजर पडताच घाम फोडणारा इंडियन मस्टीफ, मनाला आनंद देणारा चाव चाव, सीझ, दिवसभरात दोन तीन वेळा डोळ्यांचा रंग बदलणारा सायबेरियन हस्की याशिवाय डॉबर मॅन, लॅब्राडोअर, रॉटव्हिलर अशा एक ना अनेक जातिवंत श्वानांना प्रदर्शनात उतरवण्यात आले होते. श्वानप्रेमी दररोज हजारो रुपयांचा खर्च करतात. श्वान प्रदर्शनाच्या निमित्ताने शहरवासीयांना विविध जातीच्या श्वानांची माहिती मिळाली.

असे आहेत काही श्वान

पश्मी मुधोळ हाऊंड ः पश्मी ही भारतातील वेगवान श्वानाची एक जात आहे. हिला मुधोळ हाऊंड किवा कॅराव्हान हाऊंड असेही म्हणतात. पूर्वी या कुत्र्याचा उपयोग शिकाऱ्याच्या मदतीसाठी होत असे. हा श्वान सामान्य कुत्र्यापेक्षा उंच असतो. यांचा आवाज इतर कुत्र्यांपेक्षा मोठा असतो. चित्रा देशपांडे, डॉ. अभिनव माने यांनी हे श्वान प्रदर्शनात आणले होते.

इंडियन मॅस्टी ः अत्यंत देखना आणि पाहताक्षणी धडकी भरवणारी ही भारतीय कुत्र्याची जात आहे. श्वानप्रेमींना पहिल्या नजरेत या कुत्र्याचे आकर्षण झाल्याशिवाय राहत नाही. जगभरातील चार महत्त्वाच्या जातीपैकी हा एक आहे. त्याचा आकार, प्रचंड शक्ती आणि त्याची अपार निष्ठा या बाबी महत्त्वाच्या आहेत. डॉ. अभिनव माने यांनी हा श्वान प्रदर्शनात आणले होते.

केन कर्सो ः केन कर्सो हा मूळ इटालियन जातीचा श्वान आहे. अत्यंत भीतिदायक वाटणरी ही जात आहे. रक्षणासाठी हा कुत्रा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. दोन केन कोर्सो श्वान एका वाघाचा सामना करू शकतात असे श्वान मालक विक्रम देशमुख यांनी सांगितले. ते करडा (ता. रिसोड, जि. वाशिम) येथून शेरा नावाच्या श्वानाला घेऊन आले होते.

पीट बुल डॉग ः पॅड बुल डॉग हा अत्यंत अमेरिकन जातीचा आक्रमक असलेल्या श्वानाची जात आहे. लहान केसांचा कुत्रा, डोके रुंद, खोल छाती आणि मध्यम ते मोठ्या आकाराचा हा कुत्रा आहे. पीट बुल हा कुत्रा प्रेमळ, निष्ठावान आणि खेळकर वृत्तीचा समजला जातो. प्रदर्शनात आदित्य दानवे यांनी हा श्वान आणला होता.

-

चाव चाव डॉग ः चाव चाव ही उत्तर चीनमधील श्वानाची जात आहे. अत्यंत आकर्षक आणि मनाला आनंद देणारी श्वानाची जात आहे. चिनी लोकांनी दलदलीच्या प्रदेशातून कुत्र्यांच्या स्लेज खेचण्यासाठी चाव या श्वानाचा वापर केला. डॉ. सचिन जाधव यांनी त्यांचा लोरा हा श्वान प्रदर्शनात आणला होता.

सायबेरियन हस्की ः सायबेरियन हस्की ईशान्येकडील देश सायबेरियाची एक जात आहे. ही एक मध्यम आकाराची स्लेज श्वानाची जात आहे. पूर्वी सायबेरियन हस्कीचा वापर मालवाहतूक आणि वॅगन ओढण्यासाठी केला जात असे. जाड मुलायम केसाळ कोल्ह्यासारखा दिसणारा आकर्षक असा हा श्वान आहे. त्याचे डोळे निळे असून, सायंकाळी डार्क निळे तर रात्रीच्या वेळी लाल होतात. प्रदर्शनात हरिहर बोडखे यांनी या श्वानाला आणले होते.

मला लहानपणापासून श्वानांची आवड आहे. हीच आवड आता व्यवसाय बनली आहे. सध्या माझ्याकडे वेगवेगळ्या जातीची १८ श्वान आहेत. त्यांचे ब्रिड करतो, श्वानांना प्रशिक्षणही देतो. एका श्वानावर दिवसाकाठी ३०० रुपये आणि महिन्याला नऊ हजाराचा साधारण खर्च होतो. मी पोलिसांनाही जातिवंत कुत्रे पुरवण्याचे करतो. श्वानावर आपण प्रेम केले की तोही आपल्यावर तितकेच प्रेम करतो.

— विक्रम देशमुख, करडा, ता. रिसोड, जि. वाशिम