esakal | 'देह वेचावा कारणी'चे रविवारी प्रकाशन; (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र, पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb_Vikhe

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी हा कार्यक्रम 'लाईव्ह' करण्यात येणार आहे.

'देह वेचावा कारणी'चे रविवारी प्रकाशन; (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र, पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दिवंगत केंद्रिय मंत्री तथा ज्येष्ठ नेते (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचे प्रकाशन रविवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा 'लोकनेते बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था' असा नामविस्तार सोहळा होणार असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.'
 
पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, 'प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील धनंजराव गाडगीळ सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनाही निमंत्रण देणार आहोत. 
 
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी हा कार्यक्रम 'लाईव्ह' करण्यात येणार आहे. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांच्या हयातीतच आत्मचरित्र लिहिले होते. एप्रिलमध्ये प्रकाशन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी येणार होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने कार्यक्रम लांबणीवर गेला. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी आत्मचरित्राचे शब्दांकन केले असून, प्रस्तावनाही त्यांनीच लिहिली आहे. 700 पानांचा हा ग्रंथ 'राजहंस प्रकाशन' संस्थेने प्रकाशित केला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
 
ते म्हणाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते खासदार अशी प्रदीर्घ वाटचाल बाळासाहेब विखे पाटील यांची राहिली. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात एक प्रगल्भ राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. आत्मचरित्रात देशातील अनेक घडामोडींचा उल्लेख आला आहे. त्यांचे आत्मचरित्र एक ऐतिहासिक दस्तऐवज व्हावा. केवळ राजकारणच नव्हे, तर ग्रामीण विकास-सहकार-कृषी-पाटपाणी-शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी तब्बल 70 वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटविला.'
 
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'मुलखा वेगळा माणूस' या गौरवग्रंथाचे प्रकाशनही त्याच दिवशी होणार आहे. या ग्रंथात विविध क्षेत्रातील 70 नामवंत व्यक्तीचे लेख आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले