डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘आयसीएसई’मध्ये उल्लेख नसल्याने संताप

विलास कुलकर्णी
Friday, 7 August 2020

केंद्रीय बोर्ड परीक्षेसाठी (आयसीएसई) दहावीच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयासाठी 'टोटल हिस्टरी ऑफ सिविक्स' या पुस्तकाचा समावेश केला आहे.

राहुरी (अहमदनगर) : केंद्रीय बोर्ड परीक्षेसाठी (आयसीएसई) दहावीच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयासाठी 'टोटल हिस्टरी ऑफ सिविक्स' या पुस्तकाचा समावेश केला आहे. त्यात, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा उल्लेख नाही. त्यामुळे, राहुरी येथील डॉ. आंबेडकर सोशल फोरमतर्फे केंद्र सरकारचा निषेध करून, पुस्तक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

गुरुवारी राहुरी येथे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखालील डॉ. आंबेडकर फोरम तर्फे निवेदन देण्यात आले. फोरमचे जिल्हाध्यक्ष संजय भोसले, जिल्हा समन्वयक अनुसंगम शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश पवार, राहुरी शहर उपाध्यक्ष इरफान शेख उपस्थित होते.

निवेदनात म्हंटले की, "वाराणसीच्या डॉली एलन यांनी पुस्तक लिहिले असून, बंगळूरु येथील एस. इरुदया राज यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. या पुस्तकात महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यासह देश-विदेशातील विद्वानांचा समावेश आहे.

अगदी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचेही फोटो आहेत. परंतु, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुस्तकात साधा उल्लेखही नाही. जातीयवादाने ग्रासलेले हे पुस्तक अभ्यासक्रमातून तातडीने वगळण्यात यावे. अन्यथा, मोठे आंदोलन छेडले जाईल." असेही निवेदनात म्हटले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babasaheb Ambedkar was not mentioned in ICSE a statement was submitted to the tehsildar in Rahuri