कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाला अधिकाऱ्यांच्या श्रमदानाची साथ; ऐन दिवाळीत संगमनेर होणार चकाचक

cleanliness drive
cleanliness drive

संगमनेर (अहमदनगर) : आगामी स्वच्छ भारत अभियानातील स्पर्धेसाठी संगमनेर नगरपरिषदेने कंबर कसली असून, त्या अंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे दिवाळीसारख्या ऐन सणासुदीच्या काळात चकाचक शहराची अनुभूती संगमनेरकर घेणार आहेत.

कोविडच्या संवेदनशिल काळात संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य विषयक सुविधांसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपरिषदेने शहरात स्वच्छता अभियानास सुरवात केली आहे. या अंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची संकल्पना स्पष्ट करणारे संदेश देणारे भित्तीफलक रंगवले आहेत. तसेच शहरांतील अंतर्गत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरु आहे. 

शहराची शोभा वाढवणारे व्हर्टीकल बाग, मध्यवर्ती ठिकाणी सेल्फी पॉईंट, हरित संगमनेर अंतर्गत बागांची निर्मीती, महत्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदुषणमुक्त शहरासाठी पालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणावर यांत्रिक साधनांनी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे.

उघड्या गटारींची स्वच्छता, अनावश्यक झाडे, गवत, कचराकुंड्यांची साफसफाई केली जात आहे. आजपर्यंत प्रवरा नदीकाठचा परिसर, नवीन नगर रोड, नवीन अकोले बायपास, शहरातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग स्वच्छ करण्यात आला असून शहरातील इतरही भागात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या अभियानात पालिकेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी उस्फुर्तपणे सहभागी झाले असून लवकरच शहर चकाचक होणार आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली, संगमनेर नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानात भाग घेऊन उत्कृष्ठ कामगिरी केली होती.

या वर्षी नगरपरिषदेने या स्पर्धेत भाग घेऊन अव्वल स्थान पटकविण्याचा संकल्प केला आहे. मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत जबाबदारी म्हणून श्रमदान करीत आहेत.


संपादन : सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com