गुड न्यूज! नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात कपात, रेडी रेकनरचाही होणार फेरविचार

आनंद गायकावड
Sunday, 16 August 2020

कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाचा दूरगामी परिणाम देशातील सर्वच उद्योग व्यवसाय व इतर क्षेत्रावर झाला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोना या जागतिक महामारीच्या संकटाचा दूरगामी परिणाम देशातील सर्वच उद्योग व्यवसाय व इतर क्षेत्रावर झाला आहे. या लाटेत बांधकाम क्षेत्रही अडचणीत आले असून, राज्यातील मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्कामध्ये दोन ते तीन टक्के कपात केल्यामुळे मालमत्ता नोंदणीला चालना मिळण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्याच्या दुर्गम आदीवासी भागातील गिऱ्हेवाडी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ध्वजारोहण समारंभानंतर ते बोलत होते. महसूलमंत्री थोरात म्हणाले, बांधकाम क्षेत्रातील या प्रस्तावावर सरकारकडून चर्चा केली जात आहे. आजवर विकसकांसाठी राज्यात लागू असलेले पाच टक्के मुद्रांक शुल्क कमी करणे आवश्यक आहे.

राज्य सरकार या शुल्कात दोन ते तीन टक्के कपात करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत असून, या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच रेडी रेकनरचे दरही कमी केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम आदिवासी गाव असलेल्या गिऱ्हेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थेट महसुलमंत्र्यांच्या हस्ते देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी राष्ट्रगीत म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांशिवाय शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासकिय नियमांचे पालन करुन हा सोहळा साजरा झाला. ११ वर्षाच्या विशाल सोमनाथ भुतांबरे या विद्यार्थ्याने मंत्री थोरात यांना ध्वजाला मानवंदना देत ध्वजारोहणाची विनंती केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat said a reduction of two to five per cent in stamp duty on property registration